आमचे चिवचिवाटी मित्र

ऑफिसच्या व्हरांड्याला लागूनच कमी उंचीची शोभेची झाडं आहेत. त्यातील दोन तीन झाडांवर सुगरण पक्षांनी आपलं बस्तानही बसवलंय. एका झाडावर या छोट्या पक्षांची दोन तीन कुटुंबे वास्तव्याला आहेत. त्यांचे तीन चार खोपे या झाड्याच्या दाट सावलीत लटकलेले दिसतात. आणखीही एक दोन खोपे तयार करण्याच्या कामी सुगरणबुवा आणि सुगरणबाईंची लगबग चाललेली दिसते. काही खोप्यांमधून तर पिलांची गोड चिवचिवही ऐकू यायला लागलीय. बरं जमिनीपासून या खोप्यांची उंची तरी किती, तर जेमतेम अडीच ते तीन फूट. पण तरीही हे पक्षी बिनधास्त आहेत. इथे कुणीच आपल्याला त्रास देणार नाही याची खात्रीच आहे त्यांची. या व्हरांड्याजवळून सरळ गेल्यावर तीन पायऱ्या चढल्यावर कॅन्टीन आहे. दुपारी दीड-दोन तास तिथे जाणाऱ्या सहकाऱ्यांची वर्दळ असते. तेवढाच काय तो मनुष्य प्राण्याचा आणि छोट्या झाडावरच्या सुगरण पक्षांचा संबंध, तोही दूरवरचा.

आज जेवणानंतर सहज लक्ष गेल्यावर समजलं की इथे सुगरणीचा परिवारच वास्तव्य करून आहे. आमच्या जेवणाच्या वेळेसच सुगरण कुटुंबियांनीही जेवणाची वेळ ‘अॅडजस्ट’ केलेली दिसली..सुगरणबाबा आणि सुगरण आई आपल्या पिलांना घास भरवताना दिसले. आम्हाला फोटो काढायचा मोह आवरला नाही. दोन-तीन फुटांवरून आम्ही अलगद फोटो टिपायचा प्रयत्न केला. तोपर्यंत तिकडे सुगरण परिवार जगाशी काहीही घेणं नसल्यासारखा आपल्या कामात गर्क होता. किंवा आपण कामात किती गर्क आहोत. तुमच्याकडे आमचे लक्षच नाही बुवा, असेही त्यांना दाखवायचे असेल. फोटो काढण्यासाठी थोडंसं पुढं सरकलो असू-नसू. मात्र त्यांच्या चिवचिवाट वाढ झालीच. ‘माइंड युवर बिझनेस’ असं काही तरी त्यांना आम्हाला सुचवायचं असेल. त्यांचा हा पावित्रा पाहून आम्ही सपशेल माघार घेतली.

कॅन्टीनच्या तीनही बाजूच्या खिडक्या थेट दाट झाडींसमोरच उघडतात. जेवताना कुठल्याही बाजूने झाडांची हिरवाई नजरेस पडतेच. कॅन्टीनच्या तीनही बाजूला एक ऐसपैस व्हरांडा (गॅलरी म्हणा हवं तर) केलेला आहे. तिथे काही खूर्च्याही ठेवलेल्या असतात. वाटलं तर आत खा किंवा या खुर्च्यांवर बसून समोरच्या झाडांकडे, त्यावरील पक्षांकडे बघत मजेत खा. या खुर्च्यांच्या समोरच असलेल्या कठड्याच्या जवळ एका छोट्या ताटलीत पाणी, पोळ्यांचे तुकडे किंवा भात, धान्य नेहेमी ठेवलेले असते. हे पदार्थ खाण्यासाठी दिवसभर येथे साळुंख्या, चिमणी आणि बुलबुल पक्षांचा राबता असतो. इतक्या जवळून हे पक्षी आणि त्यांचे रोजचे उद्योग बघण्यातही एक गंमत असते. कधी कधी चिमणी आणि बुलबुल एकाच ताटलीत सुखेनैव चरताना दिसतात. पण त्यांच्यात भांडण होते, ते दुपारच्या वेळेस. दुपारी कॅन्टीनला जेवायला येणाऱ्यांची वर्दळ असते. त्यातही जेवणाच्या वेळेस कुणी खिडकीशी बसला, तर त्याच्या पानात जेवायला ही मंडळी थेट हजर होणार. अगदी न लाजता. बुलबुल पक्षी एरवी मनुष्याच्या फार जवळ येताना दिसत नाही. पण इथे मात्र उलटे चित्र आहे. मग एक घास चिऊला, एक घास बुलबुलला असे करत मंडळींचा जेवणाचा कार्यक्रम चालतो. खिडकीच्या कठड्यावर पोळीचा तुकडा ठेवला की बुलबुल धीटपणे तो उचलतो. कधी कधी तर हातातूनही थेट चोचीत तुकडा झेलण्याचे कौशल्यही बुलबुल दाखवतो. मध्येच पोळीचा तुकडा घेण्यासाठी एखादी चिऊताई येते. अशावेळी बुलबुल वाह्यातपणा करत तिला हूसकावून लागतो. सकाळी साडेसात आठच्या सुमारास व्हरांड्यातील ताटलीत या पक्षांसाठी पाणी आणि खाण्याचे पदार्थ ठेवावेच लागतात. त्यात जराही उशीर झालेला ही मंडळी खपवून घेत नाहीत. चुकून कधी उशीर झालाच, तर दोघे तिघे थेट कॅन्टीनच्या स्वयंपाकघराजवळ मोर्चा घेऊन चिवचिवतात. जणू काही त्यांना म्हणायचे असते, ‘काहो, आम्हाला आज विसरलात वाटतं’ अशावेळी चिमण्या आणि बुलबुलमध्ये आपोआप एकी होते. मोर्चाचे नेतृत्व स्वाभाविकपणे बुलबुलपक्षाकडेच असते. या पक्षांच्या सवयी कॅन्टीन कर्मचाऱ्यांचा आता अंगवळणी पडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या आदरातिथ्यात ते जराही कसूर करत नाहीत. ठराविक वेळेस खाणे देण्याचा त्यांचा क्रम ठरलेला आहे.

चारही बाजूंनी वेढलेल्या हिरव्यागर्द झाडीतले आमचे जैन व्हॅलीचे ऑफिस. दिवसातून कधी कामाचा कंटाळा आला की खिडकीतून बाहेर पाहायचे फक्त. पाच मिनिटांत थकवा गायब! कारण या खिडक्यांमधून कधी कोणते पक्षी, प्राणी, कीटक दिसतील ते काही सांगता यायचे नाही. चिमण्या, बुलबूल आणि सुगरण पक्षी इथे मुबलक दिसतात. त्यांची धडपड पाहिली, तर आपल्यालाही हुरूप येतो. आपण स्वत:शीच म्हणतो, ‘चला कामाला लागा’

दिवसातून कधीमधी तीन चार खारूताई खिडकीतून नजरेस पडतात. सतत कुठेतरी घाईने जायला निघाल्यासारखा त्यांचा कारभार असतो. परवा तर एका खारीला खिडकीखाली एक चऱ्हाटाची मोकळी झालेली दोरी दिसली. पुढे कितीतरी वेळ ती दोरी व्यवस्थित करण्यात तिनं घालवला. नंतर त्या दोरीला छानसा वेढा दिला आणि तोंडात धरून घेऊन गेली समोरच्या झाडीत तुरतुरत. कॅन्टीनजवळ खायला कधी कधी खारीही येतात. त्यांचं वागणं मात्र सावध असतं. परिस्थितीचा कानोसा घेऊनच त्या पोळीचा तुकडा घेऊन जाण्याची हिम्मत करतात. एरवी त्यांचे वास्तव्य ऑफिसच्या परिसरातील झाडांमध्येच जास्त दिसते.

आठवडा दोन आठवड्याच्या अंतराने वानरांची एखादी टोळी ऑफिसजवळच्या झाडांवर प्रकट होते. बरेचदा ही मंडळी जवळच्या जंगलातून दुपारची न्याहारी करून आलेली असते. ते इथे आल्यावर मस्तपैकी पाणी पितात. येथील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही त्यांना सवयीने माहीत झालेले आहेत. कधी हिरवळीवर स्प्रींकलरच्या साह्याने पाणी दिले जाते, तर कधी झाडांना थेट पाईपच्या साह्याने. यापैकी एखादा पाईप हातात घेऊन थेट तोंडाला लावला की झालं काम. पाणी पिऊन झाल्यावर जवळच्याच झाडावर थोडावेळ विश्रांती घेऊन पुन्हा समोरच असलेल्या फुडपार्कमधून केळी मिळविण्यासाठी यांचा मोर्चा वळतो. तसेही एका जागी थांबतील ती माकडं कसली. कधी जैन हिल्सवरील गांधी रिसर्च फाऊंडेशनला दिसतील, तर कधी नीम व्हॅलीतल्या गर्द झाडीत. त्यांची भ्रमंती सुरू असते.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या परिसरात गर्द आमराई आहे. सायंकाळच्या सुमारास इथल्या झाडांवर विविध पक्षांची शाळाच भरलेली दिसते. कधी भारद्वाज, कधी कोकीळ, तर कधी पोपट, इतरही अनेक प्रकारचे छोट्या- मोठ्या आकाराचे पक्षी इथे नजरेस पडतात. पहाटेच्या वेळेस या परिसरातून फिरलो, तर जवळच्या छोट्या दरीतून मोरांचे आवाज हमखास कानावर पडतात. सकाळी किंवा सायंकाळी या परिसरात निसर्गाचे अनोखे रूप अनुभवायला मिळते.

कधी ऑफिसच्या खिडकीतून, तर परिसरात ही आमची मित्रमंडळी रोजच भेटत असतात. घटकाभर त्यांच्याकडे पाहिले की मनाने ‘फ्रेश’ झाल्यासारखे वाटते. एक मात्र आहे. आमचा एक नियम आहे. त्यांच्या कुठल्याच कामात आम्ही हस्तक्षेप करत नाही आणि आमच्या ते.

  • पंकज प्र. जोशी
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s