पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार प्रदान

शेतीच्या पायाभूत विकासातच शेतकऱ्यांची प्रगती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन व उत्पन्नाचा मेळ उच्चतंत्रज्ञानातच : शरद पवार

जळगाव, ता. ९ जानेवारी २०१५ :

जो पर्यंत शेतीला शाश्वत पाणी, शाश्वत वीज व नवतंत्रज्ञान मिळणार नाही, तो पर्यंत शेती व शेतकऱ्याला प्रगतीचा मार्ग मिळणार नाही. शाश्वत मार्गासाठी चांगली बियाणे-रोपे, सूक्ष्मसिंचन यातून उत्पादित झालेल्या शेतमालाला प्रक्रिया व या प्रक्रिया झालेल्या मालाला चांगली बाजारपेठ हे चक्र पूर्ण करण्यात आपण कमी पडत असल्यानेच शेती व शेतकऱ्यांसमोरील प्रश्न सुटेनासे झाले आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही कृषी क्षेत्राच्या पायाभूत विकासासाठी अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्काराच्या दिमाखदार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकोला जिल्ह्यातील चितलवाडी येथील शेतकरी विजयराव इंगळे पाटील यांना पुरस्कार देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरदरावजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यास महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन, जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन, खासदार रक्षा खडसे, आमदार सर्वश्री हरिभाऊ जावळे, सुरेश भोळे, गुलाबराव पाटील, शिरीष चौधरी, सौ स्मिता वाघ, किशोर पाटील, गुरुमुख जगवाणी, जयकुमार रावल, सतिश पाटील, चंद्रकांत सोनवणे, पद्मश्री ना. धो. महानोर, सेवादास दलूभाऊ जैन, आदी मान्यवर उपस्थित होते.

शाश्वत शेतीसाठी आज गुंतवणुकीची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. शेतीला वीज, पाणी, उच्चतंत्रज्ञान लागते. यासाठी पायाभूत सुविधा जर निर्माण झाल्या तरच मार्ग निघेल हे ओळखून आम्ही आता पायाभूत सोयीच्या दृष्टीने गांभिर्याने विचार सुरू केल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. आज ज्या इंगळे यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे, त्यांचे शेतीतील योगदान व कार्य वाखाणण्यासारखे आहे. इंगळे यांच्यासारख्या प्रगतीशील शेतकऱ्यांनी इतर भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषीदूत म्हणून कार्य केले पाहिजे. यासाठी मी कृषी विभागाला सूचना देत असून यापुढे अधिकाधिक प्रगतीशील शेतकऱ्यांनी उच्च कृषी तंत्रज्ञान प्रसाराचे कार्य स्वत:हून पुढे येत सुरू केले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विदर्भाची ओळख ही आत्महत्या व शेतकऱ्यांच्या आव्हानांची आहे, तर दुसऱ्या बाजूला याच विदर्भातून विजय इंगळे यांच्यासारखे शेतकरी उच्च कृषी तंत्रज्ञानाच्या साह्याने प्रगतीचा नवा पल्ला गाठत आहेत. विजय इंगळेंच्या दूरदृष्टीचे कौतुक करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना कृषीदूत होऊन पुढे यावे असे आवाहनही केले.

कृषी क्षेत्राला उच्च कृषी तंत्रज्ञानाशिवाय तरणोपाय नाही. प्रगतीचा हा मार्ग कृषी तज्ज्ञांच्या अथक संशोधनातून समृद्‌ध होत असतो. ज्या ज्या शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरली त्या त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतून प्रगती साध्य करून दाखविली हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरदरावजी पवार यांनी सांगितले. आज शेतीसमोर प्रश्न अनेक आहेत शेतकऱ्यांना शेतीतील उत्पादनाचा व हाती येणाऱ्या उत्पन्नाचा मेळ कसा साधायचा? ही विवंचना आहे. यातून बाहेर पडण्यासाठी उत्पादकता जर वाढली तरच उत्पन्न वाढेल हे लक्षात घेऊन उच्च तंत्रज्ञानाची जोड शेतीला दिल्यावरच बदल शक्य आहे असेही श्री पवार यांनी स्पष्ट केले. दहा वर्षांपूर्वी बीटी कॉटनचे बियाणे भारतात आले. आज अवघ्या दहा वर्षात भारत कापूस निर्यात करत आहे. हे इथल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले. या शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांचा गौरव केला.

केवळ शेतकऱ्यांनाच नाही, तर अवघ्या जगाला पोसणारी काळी माती ही एकच आहे. आम्ही विदर्भातील शेतकरी पारंपरिक कापसाची लागवड करून त्याच्या मर्यादेत गुरफटून पडलो. यामुळेच कापसाचे नाव आमच्या कपाळावर कोरले गेले. परंतु उच्च कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून याच कापसाने आम्हाला भरघोस उत्पादनातून ताठ कण्याने उभे केले, असे भावोद्‌गार पुरस्कारप्राप्त शेतकरी विजय इंगळे पाटील यांनी पुरस्कारावर उत्तर देताना काढले. प्रयोगशील झाल्याशिवाय प्रगतीशील होता येणार नाही, म्हणून मी सातत्याने नव तंत्रज्ञानाचा शोधात राहिलो व यातच मला प्रगतीचा मार्ग मिळाला असे इंगळे यांनी स्पष्ट करून हा पुरस्कार त्यांनी आपल्या वडिलांना अर्पण केला.

प्रारंभी जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. दिवसरात्र तहानभूक विसरून आप्पासाहेबांनी कृषी क्षेत्रात स्वत:ला आयुष्यभर झोकून दिले होते. त्यांच्या कार्यातून या राज्यातील कानाकोपऱ्यात नव तंत्रज्ञानाचा विचार पोहोचला. त्यांचे हे कार्य नव्या पिढीपर्यंत अधोरेखीत व्हावे या उद्देशानेच हा पुरस्कार असल्याची भावनाही श्री. जैन यांनी व्यक्त केली. प्रसिद्‌ध निवेदिका मंगला खाडिलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दीपक चांदोरकर यांनी गणेश वंदना सादर केली, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

 क्षणचित्रे

  • दुपारी दोनला सुरू होणाऱ्या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच शेतकऱ्यांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. सुमारे सहा हजार शेतकऱ्यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. त्यात महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती.
  •  मुख्यमंत्री येण्यापूर्वी पुरस्कारासंदर्भातील ध्वनिचित्रफित दाखविण्यात येईल अशी आयोजकांनी घोषणा केली. त्यावेळी मा. शरद पवार व भवरलालजी जैन व्यासपीठामागे असलेल्या छोट्या दालनात बसलेले होते. घोषणा ऐकून ते लगेच व्यासपीठावर आले व मलाही ही डॉक्युमेंटरी पाहायची आहे असे त्यांनी निवेदकांना आवर्जून सांगितले. त्यानंतर त्यांनी सर्वांसोबत डॉक्युमेंटरी पाहिली.
  •  अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल शरद पवार साहेबांना त्यांचीच प्रतिकृती असलेले भव्य शिल्प भेट म्हणून देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गांधी टोपी, सुती हार व खादीची शाल प्रदान करून सन्मान केला, तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी व मान्यवरांनी उभे राहून श्री. पवार यांना मानवंदना दिली.
  •  आपले भाषण संपवून मुख्यमंत्री स्थानापन्न होत असतानाच समोरील शेतकऱ्यांनी केळीसंदर्भात बोलण्याची विनंती केली. शेतकऱ्यांच्या या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री पुन्हा बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी शालेय पोषण आहारात केळीचा केलेला समावेश, केळी प्रक्रियेसाठी स्वतंत्र महामंडळाच्या स्थापनेसाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती देऊन शेतकऱ्यांचे समाधान केले. यासंदर्भातही जैन साहेबच तुम्हाला मदत करतील असेही आवर्जून सांगितले, त्यानंतरच ते स्थानापन्न झाले.
  •  पुरस्कारार्थी शेतकरी श्री विजय इंगळे पाटील हे लेखक व कवीही आहेत. त्यांनी आपल्या प्रभावी आणि भावपूर्ण बोलण्यातून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि प्रगतीशील शेतीची कथा मांडल्यावर व्यासपीठावरील मान्यवरांसह उपस्थितही भारावले.

फोटो कॅप्शन:

IMG_ 7831 : विजय इंगळे व सौ जयश्री इंगळे यांना पुरस्कार प्रदान करताना मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस. व्यासपीठावर डावीकडून आ. किशोर पाटील, आ. गुलाबराव पाटील, आ. सौ स्मिता वाघ, खासदार श्रीमती रक्षा खडसे, पद्मश्री ना. धों महानोर, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदरावजी पवार, भवरलालजी जैन, आ. हरिभाऊ जावळे, ना.गिरीश महाजन, आ. सतिश पाटील, आ. सुरेश भोळे, आ. जयकुमार रावल, आदी.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s