विदर्भातील यशस्वी शेतीचा आशेचा किरण

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार विजेत्या विजय इंगळे पाटील यांची यशोगाथा यशोगाथा

ठिबकसारखे आधुनिक तंत्र वापरून काटेकोर पाणी व्यवस्थापन करत, पीकपद्धत बदलत, शेतीला जोडधंद्याची जोड देऊन पारंपरिक ज्ञान आणि आधुनिकतेची सांगड घातली, तर कमी पाण्यातही शेती यशस्वी आणि समृद्ध करता येते, हेच विजय इंगळे पाटील यांच्या यशाचे रहस्य आहे.

आजच्या घडीला विदर्भाचे नाव घेतले की शेती आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हाने प्रकर्षाने डोळ्यासमोर उभी राहतात. मागील दशकात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सर्वाधिक गालबोट याच प्रांताला लागले. वास्तविक कसदार आणि काळीभोर जमीन व इतर भागाच्या तुलनेत बऱ्यापैकी पाणी असल्याने इथे तूर, मूग, ज्वारी व पऱ्हाटी अर्थात देशी कापसाचे वाण शेतकऱी घ्यायचे. आजच्या एवढी १९७० च्या दशकात व त्यापूर्वी शेतीपुढे आव्हाने नव्हती असे म्हणता येणार नाही. शेतीसाठी तेव्हाही काळ आव्हानात्मकच होता. अशा आव्हानात विदर्भाचा शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी गौरवपूर्ण उल्लेख व्हायचा. इकडचा शेतकरी तर तिकडचा कास्तकार! हा आपला कास्तकार बांधव ध्यैर्य बाळगूनच होता. १९६९ मध्ये पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर विदर्भातील शेती व शेतकऱ्यांना शेतीच्या प्रगतीची माहिती व मार्गदर्शन मिळणे सुलभ झाले. या स्थित्यंतरात ज्या शेतकऱ्यांनी काळाची पाऊले ओळखून ९० च्या दशकात शेतीला नवतंत्रज्ञानाची जोड दिली त्या निवडक शेतकऱ्यांच्या यादीत अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील चितळवाडीचे प्रगतशिल शेतकरी विजय इंगळे पाटील यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. कृषि क्षेत्रात उच्च कृषि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी साध्य केलेल्या पथदर्शक कार्याला अधोरेखित करत ९ जानेवारी रोजी त्यांना पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार प्रदान केला जात आहे. या निमित्ताने विजय इंगळे यांच्या विषयी…

अकोला जिल्हा तसा पश्चिम विदर्भातील कृषी क्षेत्रात सुरवातीपासून आघाडीवर असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या वायव्येला तेल्हारा तालुका आहे. तालुक्यातील बहुतांश जमीन तापी-पूर्णा खोऱ्यातील असून ही शेतजमीन काळी व कसदार आहे. पाण्याची बारा महिने उपलब्धतता नसल्यामुळे शेती ही प्रामुख्याने कोरडवाहूच आहे. या तालुक्यातील चितळवाडी हे छोटेसे गाव. १९७०च्या पूर्वीपासून या गावात शेतकऱ्यांनी मूग, तूर, ज्वारी व कपाशी अर्थात पऱ्हाटीपलिकडे दुसरे काही पीक तसे रुजले नाही. या पिकांच्याच भरवशावर जेवढे येईल तेवढे आपले मानून शेतकऱ्यांनी समाधान मानले. आहे त्यापेक्षा वेगळे आपल्याला काहीतरी करता आले पाहिजे या विषयी या गावातील विजय इंगळे या शेतकऱ्याचा अपवाद होता. शेतीसाठी जे काही नवीन दिसेल ते आपल्या बांधात रुजले पाहिजे, याचा अट्टाहास विजय इंगळे यांनी सुरवातीपासूनच बाळगला. त्यांची शेतीसाठी ही धडपड १९७०च्या दशकापासून पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली. वडिलोपार्जित १४ एकर शेतीला आधुनिकतेची जोड कशी देता येईल यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू ठेवली. १९७० मध्येच त्यांनी शेतात विहीर घेतली. पाणी लागले अवघ्या ६५ फुटांवर. विहिरीला पाणी लागून त्यांचे समाधान झाले नाही. त्यांना आता पिकात बदल हवा होता.

या शोधात असतानाच १९९७-९८च्या दरम्यान बीटी कापसाचे वारे जोरात सुरू होते. याविषयी गावोगावी प्रचार अपप्रचार तेवढाच होता. अशा स्थितीत भांबावून न जाता नवतंत्रज्ञानाला सामोरे जायचा निर्णय विजय इंगळे यांनी घेतला आणि भारतातील बीटी कापसाची पेरणी करणारा पहिला शेतकरी म्हणून या बहाद्दराची इतिहासाला नोंद घ्यावी लागली. बीटी कापूस तर त्यांच्या शेतात रूजला. पारंपरिक कपाशीच्या अडीच ते तीन क्विंटल उत्पादनाच्या तुलनेत एकरी दहा ते बारा क्विंटल कापूस इंगळेंच्या हाती आला. प्रगतीचे बीज असे रूजले गेले. आता गरज होती याच्या वाढीची. मोकाट पाण्याने शेतजमिनीचा कस खालावण्यासह कापसालाही अती पाण्याचा फटका बसत होता. यात त्यांना बदल करायचा होता. शिवाय विहिरीतील ६५ फुटांवरचे पाणी थेट ९० फूटावर खाली गेले होते. पाण्याच्या बचतीसह अधिक उत्पादन घ्यायचे कसे, या शोधात त्यांनी जैन ठिबकला जवळ केले. २००१ मध्ये ठिबक लावल्याच्या पहिल्याच वर्षी एकरी पंचवीस क्विंटल कापूस घेऊन पुन्हा एकदा विक्रमाची नोंद केली. आता हाच कापूस ते ठिबकच्या साह्याने साडेअठ्ठावीस क्विंटल एकरी घेतात. या वर्षी पावसाचा फटका बसूनही त्यांचे कापसाचे उत्पादन झाले, एकरी २४ क्विंटल !

इंगळेंना केवळ शेतीतील आधुनिकताच जपायची नव्हती. याच्या जोडीला त्यांना शेतीला पुरक उद्योग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पशुधनाला आकार द्यायचा होता. पशुपालनातही त्यांनी अभ्यास करून अत्याधुनिक गोठा उभारला. शेतातील चाऱ्याचा आधार जनावरांना, तर जनावरांच्या शेणखताचा आधार शेतीला असे गणित त्यांनी जमविले. आपला लहान भाऊ संजय याला त्याची जबाबदारी त्यांनी दिली. आता याच गोठ्यात शंभर जनावरे असून यात ५० गाई व तेवढ्याच म्हशी आहेत. शिवाय याची आता डेअरी झाली तो भाग वेगळा. दूग्धोत्पादनाबरोबरच जनावरांच्या शेण आणि गोमूत्रापासून त्यांनी बायोगॅस प्लँट उभारला आहे. बायोगॅसप्लँटवर वीज निर्मिती होत असून त्यांच्या घरात या शाश्वत आणि पर्यावरणपूरक वीजेचा वापर होतोय.

विदर्भ केवळ कपाशी, पऱ्हाटी व संत्र्याच्या मालकीचा नाही. इथे केळी का रूजू नाही, याची खटपट इंगळेंनी केली नसेल तरच नवल. २००४-०५ मध्ये त्यांनी जैन टिश्यू कल्चर केळी लावण्याचा निर्णय घेतला. विदर्भातील तपमान व खान्देशमधील तपमान तसे जवळपास सारखे. तेथील उष्णतेची परवा न करता त्यांनी केळी लागवडीचा निर्णय घेतला. नुसता घेतलाच नाही, तर केळीचे यशस्वी उत्पादन घेऊनही दाखविले. आज त्यांच्याकडे २२ हजार टिश्यूकल्चर केळी आहे. अर्थात हा पीकबदल करण्यासाठी पाण्याची उपलब्धता हा मोठा आवश्यक घटक होता. शेतावर जलसंधारणाच्या उपायांतून त्यांनी पाणीप्रश्नही सोडविला आहे. पावसाचा थेंब न्‌ थेंब साठविता यावा म्हणून शेतात शेततळे बांधले आहे. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब साठवायचा आणि पिकांनाही थेंबाथेंबाने आवश्यक तेवढेच पाणी द्यायचे हा आधुनिक काटेकोर शेतीचा मंत्र इंगळे यांनी यशस्वीपणे अंगिकारला आहे. त्यांच्या शेतीतील यशाचेही तेच रहस्य आहे. शेतीसाठी तुम्ही जैन ठिबकचीच का निवड केली? यावर इंगळे यांचे उत्तर मोठे मार्मिक आहे. ते सांगतात की ज्या कंपनीच्या मालकाची नाळ माती आणि शेतकऱ्यांशी जोडलेली आहे, तोच शेतकऱ्यांची खरी कदर करू शकतो आणि शेतकऱ्याची समस्याही सोडवू शकतो, असा विश्वास वाटल्यानेच मी जैनच्या कृषी तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरूवात केली. आज इंगळे यांची शेती ८८ एकर आहे. नवतंत्रज्ञानाचा वापर आणि शेतीतील प्रयोग करून त्यांनी ही किमया साध्य केली आहे. भविष्यातही आधुनिक तंत्र वापरत शेती करत राहणार असल्याचा मानस ते व्यक्त करतात.

संपर्क

विजय आत्माराम इंगळे (पाटील)

मु. पो. चितलवाडी, ता. तेल्हारा, जि. अकोला, मो. क्र. : ९६० ४०५ ६९४४

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s