…आणि शेतकऱ्यांना मिळाले टंचाईवर मात करण्याचे बळ !

चाळीसगाव, ता. १८ : सध्याच्या अवर्षणकाळात कमी पाण्यात पिकांना जगविण्यासाठी काय नियोजन करावे… ? कपाशी लागवडीसाठी कमाल किती तापमान चालते? ठिबकच्या नळ्या साफ करण्यासाठी ॲसिडचे प्रमाण किती असावे? शेतकऱ्यांच्या अशा अनेक प्रश्नांचे आणि शंकांचे समाधान कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी अधिकाऱ्यांनी केले. निमित्त होते शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचे!

येथील भडगाव रोडवरील वैभव मंगल कार्यालयात गुरुवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी जैन इरिगेशन आणि स्थानिक वितरकांमार्फत शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी तालुक्यातील चारशेच्यावर शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी आर. एस. राजपूत यांच्यासह व्यासपीठावर कृषी तज्ज्ञ बी.डी. जडे, दिलीप बऱ्हाटे, अनुप आगीवाल, प्रगतीशील शेतकरी राजेंद्र पाटील, वाडीलालभाऊ राठोड, एल.एन पाटील, मंडळ कृषी अधिकारी आर. एच. पाटील, श्री. येवले आणि जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी डी. बी. चौधरी यांची उपस्थिती होती.

वाघडू येथील शेतकरी रंगराव पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन येणाऱ्या टिश्यूकल्चर डाळिंबाची लागवड करण्याबद्दल माहिती हवी होती, तर पिंपळवाड (म्हाळसा) येथील के.डी. देवकर यांना ठिबकद्वारे पिकाला पाणी आणि खत देण्याचे योग्य तंत्र कृषी मेळाव्यातील शास्त्रज्ञांकडून जाणून घ्यायचे होते. ठिबकवर केळी उत्पादन घेणाऱ्या वरखंडे गावच्या कौतिक गवारे यांना आता स्वयंचलित ठिबकबद्दल माहिती घ्यायची होती. या सर्वांचे समाधान शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि कृषी अधिकाऱ्यांनी मेळाव्यातील प्रश्नोत्तरातून केले. यावेळी चाळीसगावचे तालुका कृषी अधिकारी आर. एस. राजपूत यांनी वाढणारे तापमान आणि अवर्षणग्रस्त स्थितीत भाजीपाला, फळबागा, यांसारख्या पिकांना दुपारी पाणी न देता सकाळी लवकर किंवा रात्री पाणी देण्याचे आवाहन केले. आपल्या शेतातील काडीकचरा, झाडांची पाने, उसाचे पाचट फेकून न देता पिकांच्या आच्छादनासाठी उपयोग केल्यास बाष्पीभवन थांबून पाणीबचत होईल. शेतीच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‍ठिबकसिंचनाचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. शेड नेट, पॉलिहाऊसच्या योजना आणि त्यावरील शासकीय अनुदानाबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.

वरिष्ठ कृषी शास्त्रज्ज्ञ बी.डी जडे यांनी पिकाच्या प्रकारानुसार आणि पिकाच्या गरजेनुसारच ठिबकने त्याला पाणी द्यावे. गरज नसताना सात ते आठ तास ठिबकचा प्रणाली सुरू ठेऊ नये, जमिनीमध्ये वाफसा राहिल इतकेच पाणी द्यावे. त्यासाठी त्या पिकाबद्दल संपूर्ण माहिती घेऊन सिंचन करावे असे मार्गदर्शन केले. दिलीप बऱ्हाटे यांनी स्वयंचलित ठिबक सिंचनाबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली, तर अनुप आगीवाल यांनी सौर ऊर्जेचे महत्त्व स्पष्ट करत सौर कृषी पंपाचे फायदे आणि त्यासंदर्भातील सरकारी योजनांची माहिती दिली. वाडे येथील प्रगतीशील शेतकरी राजेंद्र पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करत, त्यांचे शेतीतील अनुभव उपस्थितांना सांगितले.

दीप प्रज्वलनाने शेतकरी मेळाव्याला सुरवात झाली. जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी डी. बी. चौधरी यांनी प्रास्ताविक केले. श्री. डी.एम. बऱ्हाटे यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s