पिकाच्या मुळांची खोली लक्षात घेऊन काटेकोर पाणी देणे गरजेचे

शिरपूर, ता २३ : पिकपद्धतीतील बदल हा केवळ हवामान बदलापुरता मर्यादित विषय नसून जमिनीचा कस सुधारण्यासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. उन्हाळ्याची चाहूल आता सर्वच भागांत सुरू झाली असून शेतातील पिकांना पाणी देताना आपल्या शेतात कोणते पीक आहे व त्याची मुळे जमिनीत किती खोलीवर जातात हे लक्षात घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जैन इरिगेशनचे सूक्ष्म सिंचन अभियंते डी. एम. बऱ्हाटे यांनी केले.

जैन इरिगेशन आणि शिरपूर तालुक्यातील प्रगत शेतकऱ्यांच्या वतीने वरूळ येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी धुळे येथील उपविभागीय कृषी अधिकारी पी.एम. सोनवणे, तालुका कृषी अधिकारी यु.टी. गिरासे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. अनिल ढाके, कांदा करार शेतीचे समन्वयक जी. आय. देसर्डा, अनुप आगीवाल, प्रगतीशील शेतकरी शंकर सोमजी पटेल, वृक्षमित्र श्री. राजपूत आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना पिकानुरूप जमिनीतील ओलावा समजून घेण्याची गरज आहे. हा ओलावा पिकाच्या निकोप वाढीसाठी अत्यंत मर्यादित व परिपूर्णरित्या द्यायचा असेल, तर शेतकऱ्यांना सूक्ष्मसिंचन सारख्या उच्च कृषी तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही, असे बऱ्हाटे यांनी सांगून शेतकऱ्यांना ऑटोमेशनचे तंत्रज्ञान समजावून दिले. डॉ. अनिल ढाके यांनी पाण्याच्या बचतीने केलेली शेती यातच शेतकऱ्यांचे हित असल्याचे सांगून कांदा पिकावर मार्गदर्शन केले. शासन पातळीवर राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या माहितीसह प्रगत शेतीबाबत उपविभागीय कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.

जैन इरिगेशनच्या करार शेतीबाबत जी.आय. देसर्डा यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कांदा पिकावरील खतांच्या नियोजनावर भर दिला. जागतिक मंदीचा परिणाम स्पष्टपणे आता कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि अडतींवर अप्रत्यक्षपणे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा स्थितीत शेतकऱ्यांना जास्त जर फायदा करवून घ्यायचा असेल, तर आपल्या आहे त्या शेतात अधिकाधिक आपण उत्पादन कसे वाढवू याचाच विचार केला पाहिजे. उच्च कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता हे करणे शक्य असून याचा वापर फक्त डोळस रितीने केला पाहिजे असे देसर्डा यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे स्थळ प्रगतशील शेतकरी शंकर पटेल यांच्या कांदा लागवड प्रक्षेत्राशेजारीच असल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीसह कांदा पिकाबाबत शंकांचे निरसन करता आले.

फोटो कॅप्शन : वरूळ, ता. शिरपूर येथील प्रगतीशील शेतकरी शंकर पटेल यांनी जेव्ही१२ या कांदा वाणाची लागवड केली आहे. त्याबाबत मान्यवरांना माहिती देताना श्री. पटेल.

Leave a comment