वाकोदचा वटवृक्ष अनंताच्या प्रवासाला !

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जळगाव, (प्रतिनिधी) ता. २७ : – ठिबक सिंचनाच्या माध्यमातून लाखों शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धीची पहाट फुलविणारे जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री, डॉ. भवरलालजी जैन यांच्यावर आज दुपारी जैन हिल्स येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शेतकरी व मानवतेसाठी उभे आयुष्य वेचणाऱ्या या द्रष्ट्या व्यक्तिमत्वाला अखेरचा निरोप देताना शेतकऱ्यांना अश्रूंचे बांध आवरता आले नाहीत. ज्या भूमीत त्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यावर, संशोधनावर भर दिला, त्याच शेतीत उभारण्यात आलेल्या विशेष चौथऱ्यावर त्यांचे ज्येष्ठ सुपूत्र अशोक जैन यांच्यासह अनिल, अजित आणि अतुल या चारही सुपुत्रांनी अग्नि दिला.

tiranga
Tiranga

यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदराव पवार, राज्याचे कृषीमंत्री एकनाथराव खडसे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, सहकार राज्य मंत्री दादासाहेब भुसे, आ. गुलाबराव पाटील, आ. सुरेश भोळे, आ. गुरुमुख जगवाणी, आ. स्मिताताई वाघ, आ. चंद्रकांत सोनवणे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खा. ईश्वरलाल जैन, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, ॲड. उज्ज्वल निकम, चित्रपट दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल, ज्ञानपीठ विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे, पद्मश्री ना. धो. महानोर, सेबीचे माजी चेअरमन डी.आर. मेहता, जिल्हाधिकारी सौ. रुबल अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडेय या मान्यवरांसह परिसरातील शेतकरी आणि जैन इरिगेशनचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज शनिवार पहाटे त्यांचे पार्थिव जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये नेण्यात आले. सकाळी ९.०० ते १२ पर्यंत स्व. भवरलालजी जैन यांचे पार्थिव जैन हिल्सवरील आकाश मैदानावर दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. ते ज्या कार्यालयात बसून आपले कामकाज करायचे त्या कार्यालयात दुपारी १२ वाजता त्यांचे पार्थिव, त्यांच्या आसनाजवळ काहीवेळ ठेवण्यात आले. यावेळी त्यांच्या चारही सुपुत्रांसह सर्व सहकाऱ्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. दुपारी १२.४५ च्या सुमारास त्यांच्या नेहमीच्या वाहनाने पार्थिव गौराई निवास स्थानी कुटुंबिय आणि नातेवाईकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. या वाहनाचे सारथ्य त्यांचे ज्येष्ठ सुपूत्र अशोक जैन करत होते. घरचे विधी झाल्यानंतर दुपारी सव्वादोनच्या सुमारास भवरलालजी जैन यांचे पार्थिव गौराई बंगल्याच्या अंगणात आणले. शासकीय सलामीसह शासनातर्फे त्यांचे पार्थिव तिरंग्यात आवेष्टीत करण्यात आले. त्यानंतर सजवलेल्या बैलगाडीतून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. त्यांच्या चारही सुपूत्रांनी स्वत: बैलगाडी ओढून आपल्या पित्याच्या कृषीक्षेत्रातील योगदानाला अधोरेखीत केले.

दुपारी अडीचच्या सुमारास अंत्येष्ठीस्थळावर भवरलालजी जैन यांचे पार्थिव आणण्यात आले, तेव्हा हजारोंचा समुदायाने उभे राहून त्यांना आदरांजली वाहिली. काही वेळ विसावा आणि धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर ठिक सव्वातीनच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्काराला सुरवात झाली. अत्येंष्ठी गार्डचे प्रमुख रविंद्र बनतोडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस कर्मचाऱ्यांनी जैन यांच्या पार्थिवाला सलामी दिली. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन मान्यवरांनी आणि जैन कुटुंबियांनी भवरलालजी जैन यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केले. पावणेतीनच्या सुमारास देशाच्या या सुपूत्राला शासनातर्फे पोलिसपथकाने तोफांची सलामी दिली. त्यानंतर पार्थिवावरील तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक जैन यांचे ज्येष्ठ सुपूत्र अशोक जैन यांना हस्तांतरीत करण्यात आला. दुपारी साडेचारच्या सुमारास मंत्रोच्चारात स्वर्गीय भवरलालजी जैन यांच्या पार्थिवाला त्यांचे चारही सुपूत्र अशोक, अनिल, अजित आणि अतुल यांनी अग्नी दिला. त्यानंतर उपस्थित सर्वांनी देशाच्या या कृषीरत्नाला भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहिली.

यांनी वाहिले भवरलालजींना कृतज्ज्ञ भावनेतून पुष्पचक्र

antyayatra photo
antyayatra

अंत्यसंस्कारापूर्वी स्व. भवरलालजी जैन यांच्या पार्थिवाला सर्वप्रथम माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पुष्पचक्र वाहिले. त्यानंतर त्यांचे स्नेही आणि देशाचे माजी कृषीमंत्री खा. शरदराव पवार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषीमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्य मंत्री दादा भुसे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. जैन कुटुंबियांच्या वतीने संघपती सेवादास दलूभाऊ जैन यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर अनुक्रमे न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, बी. आर. मेहता, आ. गुलाबराव पाटील, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. सौ. स्मिता वाघ, आ गुरुमुख जगवानी, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, ॲड उज्वल निकम, शांतीलाल मुथा, रतनलालजी बाफना, खा. ईश्वरलाल जैन, विठ्ठलशेठ मणियार, डॉ. सुसील मुन्शी, पद्मश्री ना.धो. महानोर, आस्तिक पांडेय, डॉ. सुभाष चौधरी, राजेशकुमार जैन, रमेश जैन, सिद्धार्थ मयूर, फरहाद गिमी, आनंद गुप्ते, डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. जब्बार पटेल, शेतकरी आत्माराम भंगाळे, महेंद्र पाटील, भागवत पाटील, शिवाजीराव देशमुख, डिलर्स प्रशांत चौधरी, संपत देशमुख, धाकडे बंधू कांतीलाल जैन, जैन इरिगेशनच्या वतीने ए. एस. आजगावकर, आर.एस. स्वामीनाथन, जे.जे. कुलकर्णी, मनोज लोढा, डॉ.जे.के दोशी, डी. एम. जैन, गिरधारीलाल ओसवाल, पुतणे विजय जैन, शशिकांत जैन, राहुल जैन, अभय जैन, आर. बी. जैन, तसेच भवरलालजी जैन यांचे नातवंडे अथांग, अभेद्य, अभंग, आत्मन, अन्मय, अमोली, आरोही, आशुली, जैन यांचे सुपूत्र आणि स्नुषा श्री. अशोक व सौ. ज्योती जैन, श्री. अनिल व सौ. निशा जैन, श्री. अजित व सौ शोभना जैन, श्री. अतुल व डॉ. भावना जैन यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

क्षणचित्रे

 • भर दुपारच्या रणरणत्या उन्हात असंख्य सहकारी आदरणीय भवरलालजी जैन यांना शेवटचा निरोप देण्यासाठी दुपारी 12 वाजेपासूनच जैन हिल्स येथे मिळेत त्या वाहनाने येत होते.
 • अंत्य संस्कार बघता यावा यासाठी अंत्यसंस्कारस्थळी ठिकठिकाणी मोठे एलईडी स्क्रिन लावण्यात आले होते. स्व. भवरलालजी जैन यांचे छायाचित्रासह सुविचार देखील लावले गेले होते.
 • शेतीच प्राण असलेल्या स्व. भवरलालजी जैन यांचे पार्थिव सजवलेल्या बैल गाडीत ठेवण्यात येऊन चारही सुपुत्रांसह जैन परिवाराच्या सदस्यांनी ती गाडी ढकलत अंत्यसंस्कार स्थळी आणली. या काळात पुणेरी पगडी, पारंपरिक वेष धारण केलेल्या 101 ब्रह्मवृंदानी वेद, मंत्रोच्चार आणि भजनी मंडळाचा टाळ मृदंगाचा जय जय रामकृष्ण हरीचा गजर सुरु होता.
 • कार्यक्रमाचे निवेदन करताना ज्येष्ठ रंगकर्मी शंभु पाटील यांचा आवाज गहिवरून येऊन त्यांना अश्रु अनावर होत होते.
 • अनुभूती स्कूलच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी भजने गायली.
 • छायाचित्रणासाठी ट्रॉली, फोर्कक्लिब आणि ड्रोन चा उपयोग करण्यात आला होता.
 • आपले अत्यंत हृदयस्पर्शी मनोगत माजी राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले ते असे की, भवरलालजी जैन यांचा मला भाऊबिजेला फोन येत असे, मला ते बहिण मानत होते. कृषि क्षेत्रातील त्यांचे कार्य म्हणजे ते ‘शेतकरीरत्नच’ म्हणायला हवे.
 • शासनाच्या वतीने शालिग्राम आईके आणि अंत्येष्ठी गार्ड प्रमुख रवींद्र बनतोडे यांनी शासकीय इतमामाचे सोपस्कार पार पाडले. स्व. भवरलालजींना मानवंदना, तोफांची सलामी देण्यात आली.
 • ———
 • शेतकर्यांचा द्रष्टा हरपलाशेती, शेतकरी व शेतात राबणारे मनुष्यबळ यांच्या जीवनमानात उंचावण्यात भवरलालजी जैन यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले असून आयुष्यभर त्यांनी बळीराजाच्या विकासाचा ध्यास अंगी बाळगला. या द्रष्ट्या व्यक्तीमत्त्वाची परमेश्वराला गरज भासली असेल म्हणून त्याने भवरलालजींना देवाघरी बोलाविले या शब्दात माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सर्वच गोष्टी आपल्या हातात नसतात. काही गोष्टींसाठी खूप झुंजावे लागते. भवरलालजींना आयुष्यात अनेक संकटे आलीत. या संकटांवर त्यांनी मात करीत कामाचा डोंगर उभा केला. शेतीतील नव्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दुसर्या बाजूला संशोधनावरही त्यांनी भर दिला. देशावर, शेतीवर शिवारात राबणार्या माणसाच्या हिताचा विचार करुन नव्या संशोधनाचा लाभ बळीराजाला कसा देता येईल हाच ध्यास त्यांनी शेवटपर्यंत जपल्याचे शरद पवार म्हणाले. माझ्या त्यांच्याशी अनेकवेळा चर्चा व्हायच्या. चर्चेतले विषय केवळ कृषी क्षेत्राशी निगडीत असायचे. कृषी क्षेत्राशिवाय भारताला महासत्ता होता येणार नाही हे लक्षात घेत आमच्या चर्चा या कृषीक्षेत्राभोवतीच असायच्या. आजवरच्या आमच्या मैत्रित कधीही राजकारण   वा व्यक्तिगत लाभाची चर्चा त्यांनी कधी केली नाही असेही स्पष्ट केले.

  त्यांच्या निधनाने दुःख जरुर झाले आहे. या दुःखावर अश्रू आता ढळू न देता भवरलालजींच्या स्वभावातील जिद्द, चिकाटी घेऊन संकटावर मात करून नव निर्माणाची उर्मी बाळगणे हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांची पुढची पिढी हे कार्य समर्थपणे पुढे नेईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

  कर्मयोगी कृषीरत्न काळाच्या पडद्याआड- माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील गांधी विचारावर नितांत श्रद्धा ठेवत ज्यांनी केवळ शेती, शेतकर्यांसाठी आयुष्य वेचले त्या शांतीस्वरुप कर्मयोगी कृषीरत्नाला आपण मुकलो आहोत या शब्दात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचे कर्तृत्व हे अफाट आहे. ठिबकच्या माध्यमातून त्यांनी कृषीक्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. आपल्या उद्योग-व्यवसायाचा जागतिक पातळीवर विस्तार साधुनही त्यांनी आपली भूमिका उद्योजकापल्याड नेऊन सामाजिक बांधिलकीसाठी विविध उपक्रम हाती घेणार्यामध्ये भाऊंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल असे त्या म्हणाल्या.

  व्यावसायिक व कंपनीच्या विस्तारात सातत्याने गुंतलेले असतानाही त्यांनी व्यक्तीगत पातळीवरचे आपले स्नेहसंबंध तेवढ्याच जबाबदारीने सोज्वळतेने जपले. मी खान्देशकन्या असल्यामुळे मला ते सुरुवातीपासून बहिण मानत. एकही भाऊबीज माझी त्यांनी शुभेच्छाविना जाऊ दिली नाही. ते आजारी आहेत हे समजल्यावर मी त्यांच्याशी बोलले होते. हा परमेश्वराचा मिसकॉल ठरेल व भाऊ यातून सहीसलामत नेहमीप्रमाणे आजारावर मात करतील असे वाटले होते.

  कृषीक्षेत्राचे प्रेरणास्त्रोत आता शक्तीस्थळ बनो!

  -कृषीमंत्री एकनाथराव खडसे

  भवरलालजी जैन हे देशातच नव्हे, तर जागतिक पातळीवर कृषीक्षेत्रात क्रांती घडविणारे क्रांतीपुरुष होते. त्यांच्या कार्यातून जळगावचे नाव जगभर सन्मानाने पुढे झाले. उद्योजक असूनही त्यांनी आपण सामान्य शेतकर्यांचे पुत्र आहोत याला विसर न पडू देता आपली कष्टाची परंपरा कायम ठेवत त्याला गांधी विचारांची जोड दिली. त्यांचे कृषीक्षेत्रातील कार्य हे सर्वासाठी प्रेरणास्त्रोत व शक्तीस्थळ राहिल या शब्दात महाराष्ट्राचे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्र शासनाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊनच राज्यसरकारने विशेष बाब म्हणून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

  जागतिक वॉटर युनिव्हर्सिटीचे त्यांचे स्वप्न आम्ही साकार करु -अनिल जैन भवरलालजी जैन यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी जैन इरिगेशन परिवाराच्यावतीने भवरलालजी जैन यांचे सुपुत्र अनिल जैन यांनी सर्वांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत भाऊंनी जे निर्धार केले होते, त्या निर्धाराला आम्ही पूर्ण करु असे सांगितले. मागील काही वर्षांपासून मोठ्याभाऊंनी जल नियोजनात जागतिक विस्तार साध्य केल्यानंतर एका विश्वविद्यापिठाची आखणी सुरु केली होती. याचबरोबर ग्रामीण भागातही शेतकरी जनतेला अत्यल्प किंमतीत पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी सौरऊर्जेच्या सहाय्याने विशेष संशोधन प्रकल्प हाती घेतला होता. या संशोधनाला जागतिक पातळीवर उत्कृष्ट तंत्रज्ञानाचे मानांकन बहाल झाले. हे या तंत्रज्ञानातून उभारलेले प्रकल्प जळगाव जिल्ह्यातील काही गावात पोहोचविण्याचा त्यांचा निर्धार होता. त्यांचे हे स्वप्न आम्ही सर्वजन पूर्ण करु असे अनिल जैन यांनी स्पष्ट केले. भाऊंचा कटाक्ष हा जळगावातील विविध सामाजिक उपक्रमांवरही होता. यात जळगावमध्ये सर्वसामान्यांना मोठ्या आजारांवर उपचार होतील अशा स्वरुपाचे एक अद्ययावत हॉस्पीटल उभारण्याचे त्यांच्या मनात होते. हे हॉस्पीटलही लवकरच उभारले जाईल. याचबरोबर त्यांच्यानावे कृषीक्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील एक मोठा पुरस्कार दरवर्षी दिला जाईल अशी घोषणा त्यांनी केली.

  बॉक्स

  भाऊंच्या अंत्यसंस्काराला जलसंपदा मंत्री झाले जळगावातील सामान्य भूमिपुत्र राज्यभरातून भवरलालजी जैन यांच्या अंत्यसंस्काराला अनेक मान्यवर उपस्थित झाले होते. यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही होते. भाऊंचे जन्मगाव असलेल्या वाकोदच्या जामनेर तालुक्यातून गिरीशभाऊंचा राजकीय प्रवास सुरु झाल्याने त्यांना भाऊंप्रती एक वेगळा स्नेह होता. आपल्या जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार नेणार्या भवरलालजी जैन यांना ते नेहमी मार्गदर्शक मानायचे. आपल्या या लाडक्या आदर्शस्थानी असलेल्या व्यक्तिमत्त्वाला अखेरचा निरोप देणार्या अंत्यसंस्कारप्रसंगी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवत भूमिपुत्राच्या नात्याने विविध कामे उचलली. त्यांचा हा वावर सर्व शेतकर्यांच्या मनाला जाऊन भिडला.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s