जैन हिल्स शेतकऱ्यांसाठी कृषी पंढरी : शरद पवार

राष्ट्रीय डाळिंब परिषदेला प्रारंभ; डाळिंब रत्न पुरस्कारांचे वितरण

जळगाव, ता. १६ : शेतीतील प्रश्नांची गुंतागूंत ही वाढत चालली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या पिकनिहाय प्रश्नांचा विचार करून शेतकऱ्यांना त्याच्या समस्येचे शास्त्रोक्त समाधान करून घेता यावे, भविष्यातील शेतीबाबत त्याला दिशा कळावी या उद्देशाने भवरलालजी जैन यांनी सूक्ष्म नियोजन करून हे जैन हिल्स उभारले आहे. शेतकऱ्यांसाठी ही प्रेरणा देणारी कृषी पंढरीच असल्याचा गौरव भारताचे माजी कृषीमंत्री खा. शरदराव पवार यांनी केला. जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. जळगाव आणि अखिल महाराष्ट्र डाळींब उत्पादक संशोधन संघ पुणे  यांच्या संयुक्त विद्यमाने जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय डाळिंब परिषदेचे उदघाटन व प्रगतीशील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कररण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे कृषीमंत्री एकनाथराव खडसे होते.

यावेळी विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री मा. गिरीश महाजन, पद्मश्री ना. धो. महानोर, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, खासदार ईश्वरलाल जैन, आमदार सौ. स्मिता वाघ, आमदार सर्वश्री डॉ. गुरुमुख जगवाणी, सतिश पाटील, किशोर पाटील, संजय सावकारे, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे,  जळगावचे महापौर नितीन लढ्ढा, महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख,  वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ व सीएचएआयचे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर चे संचालक डॉ. आर. के. पाल, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधक संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक, सेवादास दलूभाऊ जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

देशातील शेतकऱ्यांमध्यये आता कमालीची जागृतता आली आहे. उपलब्ध असलेल्या कमी पाण्यावर त्याला विविध पिकांच्या माध्यमातून अधिक उपन्न कसे घेता येईल याचे उत्तर हवे आहे. भवरलालजी जैन यांनी याच प्रश्नावर प्रयोगशाळेतील संशोधनाला इथल्या जमिनीवर अगोदर जोडून पाहिले. जैन हिल्सच्या या माळरानावर फलोत्पादनापासून विविध पिके त्यांनी बहरून दाखविली. ही शाश्वतता संपूर्ण अभ्यासाअंती शेताच्या बांधापर्यंत पुढे केल्याने शेतकऱ्यांची श्रद्धा जैन इरिगेशनशी जुळल्याचे श्री. पवार यांनी सांगून आज त्यांच्या पश्चात होणाऱ्या या परिषदेच्या यशाला म्हणूनच आगळे महत्त्व असल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला. पाण्याचा काटेकोर उपयोगासाठी सूक्ष्म सिंचन, फळबागांसाठी टिश्यूकल्चर यातूनच शेतकऱ्यांचे भले करण्याचा ध्यास भवरलालजींना होता. या तंत्राचा उपयोग करून आज देशातील डाळिंब उत्पादक शेतकरी समृद्ध झाले आहेत, असे सांगून पाण्याचा काटेकोर वापर शेतकऱ्याला करावा लागणार असण्याची गरजही त्यांनी बोलून दाखविली. डाळिंब पिकाला पाणी लागत नाही असे नाही. डाळिंबाला जर  पुरेसे पाणी असेल, तर त्यावर रोगाचा प्रादुर्भाव सहसा होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जगातील डाळिंबापैकी ६० टक्के क्षेत्र भारतात आहे, मात्र क्षेत्राच्या तुलनेत आपली निर्यात दहा टक्क्यांपेक्षाही कमी आहे. यातील संधी ओळखून शेतकऱ्यांनी रोगमुक्त डाळिंबाच्या उत्पादनासाठी तेल्यारोगमुक्त ऊतिसंवर्धित डाळिंब लागवडीवर भर देण्याची सूचना त्यांनी केली.

वातावरणातील बदलाला पिक पद्धतीत बदल हाच उपाय : कृषी मंत्री ना. एकनाथराव खडसे

राज्याच्या कोरडवाहू क्षेत्राला व या क्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग जर द्यायचा असेल, तर पारंपरिक पिकपद्धतीला बगल देऊन बदलत्या वातावरणानुसार ऊतिसंवर्धित डाळिंबासारख्या शाश्वत फलोत्पादनाकडे वळण्याशिवाय पर्याय नाही, असे राज्याचे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. राज्यातील काही भागात नापिकीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता नवतंत्रज्ञानाची कास धरून पुन्हा उभे राहिले पाहिजे. यासाठी शासकीय पातळीवरून वेळोवेळी नियोजनही आम्ही करू असे खडसे यांनी स्पष्ट करून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला. ऊतिसंवर्धित डाळिंबासारख्या पिकाने हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगती साध्य करून दाखविली आहे. एका बाजूला कृषी शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन, शेतकरी यांनी यात यशस्वीता साध्य करूनही दुसऱ्या बाजूला कृषी विद्यापीठ पातळीवर अजूनही या संशोधनाला तांत्रिक कारणांमुळे मान्यता नाही. ही मान्यता नसल्याने अडचणी निर्माण झाल्या. यावर आम्ही विचार केला असून लवकरच ऊतिसंवर्धन अर्थात टिश्श्यू कल्चरला विद्यापीठातर्फे मान्यता मिळवून शेतकऱ्यांना ऊतिसंवर्धित डाळिंब रोपांसाठी अनुदान देण्याबाबत सकारात्मक विचार करू असेही त्यांनी आश्वासन दिले. कृषी क्षेत्राचा आढावा घेताना त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून जैन इरिगेशनच्या उच्च तंत्रज्ञानाचा, संस्थापक भवरलालजी जैन यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा याचबरोबर माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी कृषी क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. भवरलालजी जैन यांच्या पश्चात एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे. संबंध आयुष्य त्यांनी शेतकऱ्यांसाठी वेचून एरवी पुण्यामुंबई पर्यंत मर्यादित असलेल्या विविध कृषी तज्ज्ञांना घेऊन अशा महत्त्वपूर्ण विषयावरच्या परिषदांचे जळगाव सारख्या ठिकाणी आयोजन करून येथील शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळवून दिला, हे विशेष असल्याचे श्री. खडसे यांनी आवर्जून सांगितले.

लातूरच्या पाणीप्रश्नाचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. समस्या कितीही आव्हानात्मक असल्या तरी यावर पर्याय काढण्याकरता शासन तत्पर असल्याचेही ते म्हणाले. मिरजेहून लातूरला पाणीपुरवठा करण्याचे धाडसी पाऊल शासनाने उचलले. हे पाणी रेल्वेवॅगनमध्ये भरण्यासाठी मिरज येथे विशिष्ट तंत्रज्ञानाची व याचबरोबर तशा विशेष पाईपांची अत्यावश्यकता होती. काम युद्ध पातळीवर करण्यासाठी आम्ही जैन इरिगेशनला संपर्क साधला. त्यांनी अवघ्या दोन दिवसात हे तंत्रज्ञान व तसे पाईप बनवून दिल्यामुळेच वेळेत या वॅगन रवाना होऊ शकल्या याचा गौरवपूर्ण उल्लेखही खडसे यांनी आपल्या भाषणात केला.

भवरलालजींच्या योगदानामुळेच जळगाव जिल्हा भारतात आघाडीवर : ना. महाजन

पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन अनेक शेतकरी नव्या तंत्राच्या साह्याने पाणी बचतीतून चांगले उत्पादन घेत आहेत. अशा शेतकऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. डाळिंबासारख्या पिकातून शेतकऱ्यांनी साध्य केलेली प्रगती व त्यांचे प्रयोग पाहून मलाही आमच्या शेतात डाळिंबाची लागवड करण्याची इच्छा होत असल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. शेती आणि शेतकऱ्यांना जगवायचे असेल, तर ठिबक सिंचन तंत्र, टिश्यूकल्चरसारख्या आधुनिक तंत्राची कास धरावी लागेल. आजच्या परिषदेत जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांची उणिव भासत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. त्यांनी रात्रंदिवस घेतलेल्या शेतीच्या ध्यासामुळे आज जळगाव जिल्हा राज्यात ठिबकच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. याच तंत्रज्ञानातून देशातील शेतकरी समृद्ध झाला आहे. टिश्यूकल्चरद्वारे जैन इरिगेशनने देशातील शेतीत क्रांती आणल्याचे गौरवास्पद उदगारही त्यांनी काढले.

डाळिंबाची ताकद आज सोन्या चांदीपेक्षाही वाढली असून या पिकाने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना बळ दिले आहे. आपण आजच जैन हिल्स येथील आधुनिक ऊतिसंवर्धित प्रयोगशाळा पाहून आमचा विश्वास द्विगुणित झाला आहे. या डाळिंब परिषदेतून तेल्यासारख्या रोगाच्या संशोधनाला अधिक वाव मिळेल असा विश्वास माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी बोलून दाखविला.

जय विज्ञान, जय किसान

जगभरात आरोग्यदायी फळ म्हणून डाळिंब पिकाला मागणी वाढत असून भारतात वर्षभरात या डाळिंबात ४ ते पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. पुढील पाच वर्षात ही उलाढाल दहा हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असून दुष्काळात शेतीसाठी मूल्यवर्धित पीक म्हणून डाळिंब पिकाकडे पाहावे लागेल, असे जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी स्वागतपर भाषणात सांगितले. जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांनी शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांची सांगड घालून ‘जय विज्ञान जय किसान’ हे सूत्र प्रत्यक्षात उतरविले. आजच्या या परिषदेचे आयोजन त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधक संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक यांनी परिषदेबद्दल आपल्या प्रास्ताविक केले. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. के. पाल, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथन यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. याचबरोबर यावेळी ‘टिश्यूकल्चर डाळिंब लागवड -जैन तंत्रज्ञान’ आणि डाळिंब संघाच्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधक संघाचे सचिव शिवलिंगप्पा संख यांनी आभार प्रदर्शन केले. विनोद रापतवार यांनी सूत्रसंचालन केले. दीपक चांदोरकर यांनी गणेशवंदना सादर केली.

Dalimb Ratna Purskar vijete

‘डाळिंब रत्न’ पुरस्काराचे वितरण

राष्ट्रीय डाळिंब परिषदेत माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरदराव पवार, राज्याचे कृषी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते देशातील प्रगतीशील डाळिंब उत्पादक शेतकरी, डाळिंब संशोधकांना जैन इरिगेशन सिस्टिम्स्‌ लि. तर्फे ‘स्व. हिरालाल जैन डाळिंब नवतंत्र पुरस्कार’ तर अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघातर्फे ‘डाळिंब रत्न’ पुरस्कार बहाल केले. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  .

स्व. हिरालाल जैन नवतंत्र डाळिंब पुरस्कारप्राप्त शेतकरी

– श्री. विष्णुपंत अनाजी रहाटळ, जवळे कडलग, ता. संगमनेर, जि. अहमदनगर, श्री. विरचंद कांतीलाल पटेल, खिमत, ता. धनेरा, जि. बनासकांठा, गुजरात; श्री. आर. एस. श्रीकांत, खानापूर, जि. मेहबूबनगर, तेलंगाणा, श्री. कुलदिप राजाराम राऊत, सावरगाव, ता. मंगरूळपीर, जि. वाशिम; श्री. एकांत राज, कडूर, जि. चिकमंगलूर, कर्नाटक.

डाळिंब रत्नपुरस्कारप्राप्त शेतकरी

श्री. दत्तात्रय साहेबराव भोसले, सरकोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर; श्री. प्रताप रामभाऊ काटे, काटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे; श्री. संदिप माधव पवार, निळवंडे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर; श्री. ज्ञानदेव बापू सावंत, हावालदारवाडी, ता. माण, जि. सातारा, श्री. अंबादास चांगोजी साळुंखे, शहापूर, ता. अंबड, जि. जालना, श्री. संदिप तुकाराम चव्हाण, वडज, ता. जुन्नर, जि. पुणे; श्री. अशोक जगन्नाथ पाटील, कुंभारखेडा, ता. रावेर, जि. जळगाव; श्री. राजेंद्र कृष्णकांत गिरमे, बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे; श्री. बाबासाहेब पोपटराव भालेराव, राजुरी, ता. राहाता, जि. अहमदनगर; ॲड. शरद किशनराव नाईकनवरे, माजलगाव, जि. बीड.

डाळिंब रत्न पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ व संशोधक श्रीमती डॉ. ज्योत्स्ना शर्मा, वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर, डॉ. सुनिल ज्ञानेश्वर मासाळकर, सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे; डॉ. विनय शंकर सुपे, संचालक, विस्तार व शिक्षण, महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन परिषद, पुणे.

‘दैनिक ॲग्रोवन’ला यंदाचा ‘डाळिंब रत्न पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. संपादक आदिनाथ चव्हाण यांनी तो स्वीकारला.

———

फोटो कॅप्शन :

१.राष्ट्रीय डाळिंब परिषदेत डाळिंब रत्न पुरस्कारप्राप्त शेतकरी व मान्यवर

२.राष्ट्रीय डाळिंब परिषदेचे डाळिंबाच्या टोपलीचे अनावरण करून अभिनव उदघाटन करताना केंद्रीय कृषीमंत्री शरदराव पवार, राज्याचे कृषीमंत्री एकनाथराव खडसे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, व मान्यवर

३. परिषदेला देशभरातून जमलेले शेतकरी.

४. डाळिंब संघाच्या स्मरणीकेचे आणि टिश्यूकल्चर डाळिंब लागवड- जैन तंत्रज्ञान या पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर

—-

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s