निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी जमीन, खत व पाण्याचे व्यवस्थापन आवश्यक

जळगाव, दि. 16 (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात डाळिंब लागवड क्षेत्र अधिक आहे, परंतु निर्यातक्षम, गुणवत्तेच्या डाळिंब उत्पादनासाठी डाळिंबाची रोगमुक्त टिश्युकल्चर रोपे, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून खते व पाण्याचे सुयोग्य नियोजन या गोष्टिवर विशेष भर देणे आवश्यक आहे असा सूर राष्ट्रीय डाळिंब परिषदेच्या तांत्रिक सत्रात तज्ज्ञांनी काढला.

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या कस्तुरबा ऑडिटोरियम हॉल येथे डाळिंब क्षेत्रातील तज्ज्ञ, भारतभरातून आलेले डाळिंब उत्पादक प्रगतीशील शेतकरी यात सहभागी झालेले आहेत. उद्घाटन सत्रानंतर लगेच तांत्रिक सत्रास आरंभ झाला. यात डाळिंब पिकातील सुधारणा व रोपवाटिका व्यवस्थापन, डाळिंब गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी जमिनीचे व्यवस्थापन, रोगमुक्त डाळिंब टिश्युकल्चर निर्मितीचे तंत्रज्ञान त्याचप्रमाणे डाळिंब रोपनिर्मिती आणि रोपवाटिका व्यवस्थापन यासंदर्भात तज्ज्ञांनी दृकश्राव्य माध्यमातून सादरीकरण केले. तांत्रिक सत्राच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. जोत्सना शर्मा होत्या. विषय तज्ज्ञ म्हणून डॉ. एच. पी. सिंग, डॉ. डी. टी. मेश्राम, शहाजीराव जाचक, जैन इरिगेशनचे डॉ. अनिल पाटील, डाळिंब संशोधन केंद्राचे डॉ. सुनिल पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे डॉ. राजेश काटकर यांनी मार्गदर्शन केले.

माजी फलोत्पादन संचालक डॉ. एच. पी. सिंग यांचे डाळिंब पिकातील आव्हाने, पर्याय आणि उत्पादन, उपयोग यातील संधी या विषयावर बिजभाषण झाले. सुमारे ६ हजार वर्षांपूर्वी पुरातन ग्रंथांमध्ये डाळिंब फळाचा उल्लेख आढळतो. या फळाला फ्रूट ऑफ टेबल चा मान मिळालेला आहे, परंतु ते हेल्दी फळ म्हणून खूप महत्त्वाचे ठरले. निर्यातक्षम फळासाठी खते, पाणी, अन्नद्रव्य यांचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी पूर्वी मोकाट पद्धतीने पिकांना पाणी देत असत. आता तंत्रज्ञान सुधारून ठिबक सिंचनाने पाण्याचे व्यवस्थापन करतात ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. 2002 मध्ये डाळिंबचे नगण्य लागवड क्षेत्र होते. ते अलीकडे सुमारे दीड लाख हेक्टरवर डाळिंबाची लागवड होते. भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी फलोत्पादन महत्त्वाचे ठरेल. उच्चतंत्रज्ञान आणि शास्त्र यामुळे कमी पाणी, कमी जमिनक्षेत्रामध्ये डाळिंबाचे उत्पादन वाढवावे लागेल असे त्यांनी आपल्या बिजभाषणात सांगितले.

राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी देखील मार्गदर्शन केले. महाराष्ट्र फलोत्पादनाच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. आंबा, केळी, द्राक्ष आणि आता डाळिंब यामुळे महाराष्ट्राचे फलोत्पादन क्षेत्र वाढलेले आहे. शेतकरी उच्चकृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करुन उत्पादन करीत आहेत. महाराष्ट्रातून 83 हजार मॅट्रीक टन द्राक्षाची निर्यात या आर्थिक वर्षात झालेली आहे. डाळिंबाची निर्यातदेखील वाढविणे अत्यंत आवश्यक आहे असे आवाहन करत ऑनलाईन ‘अनार नेट’ यासाठी मार्च 2016 पर्यंत केवळ 430 डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंद केली. डाळिंब निर्यातीची उत्तम संधी शासनाने उपलब्ध करुन दिलेली आहे मात्र शेतकरी याबाबत उदासीन दिसतात अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. एप्रिल महिन्याची ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी डाळिंब निर्यातीसाठी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. राजेश काटकर यांनी गुणवत्तापूर्ण डाळिंब उत्पादनासाठी सक्षम, चांगली माती आवश्यक असल्याचे नमूद केले. डाळिंब लागवडीपूर्वी शेतकऱ्यांनी माती परिक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. माती परिक्षणाशिवाय शेतकऱ्यांनी जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्ये टाकले तर त्याचा दुष्परिणामही होऊ शकतो. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन शेतकऱ्यांनी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. डाळिंबासाठी ६ ते ८ पीएच (सामू) असणे आवश्यक असतो असेही त्यांनी सांगितले. नत्र, स्फूदर, पालाश, कॅल्शियम, सल्फर आदी अन्नद्रव्ये गरजेनुसार देणे आवश्यक असल्याचे सांगून जमिनीच्या उत्तम आरोग्यासाठी पिकांची फेरपालट, पाण्याच्या योग्य मात्रा त्याचप्रमाणे संतुलित खतांच्या मात्रा देण्यावरही शेतकऱ्यांनी भर द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

डाळिंब संशोधन केंद्र लखमापूरचे डॉ. सुनिल पाटील यांनी उत्तम गुणवत्तेची डाळिंब रोपे आणि रोपवाटिका व्यवस्थापन यासंदर्भात तांत्रिक मार्गदर्शन केले. बियांद्वारे गुटीकलम व छाटणी यापेक्षा ऊतीसंवर्धित अर्थात टिश्युकल्चर रोपांना शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे असे आवाहन केले. टिश्युकल्चर रोपांमुळे होणाऱ्या फायद्यांची सविस्तर चर्चा त्यांनी आपल्या सादरीकरणातून केली.

जैन इरिगेशनचे डॉ. अनिल पाटील यांनी रोगमुक्त डाळिंब टिश्युकल्चर रोपनिर्मितीबाबत मार्गदर्शन केले. व्हायरस फ्री अर्थात रोगमुक्त रोपांमुळे निर्यातक्षम गुणवत्तापूर्व डाळिंबाचे उत्पादन घेता येते असा आत्मविश्वास त्यांनी शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला.

उद्याचे तांत्रिक सत्र :

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी अर्थात 17 एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता दुसऱ्या दिवसाच्या तांत्रिक सत्रास सुरुवात होईल. खत आणि पाणी व्यवस्थापन याविषयी डॉ. एच. पी. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. राजेश काटकर, डॉ. डी. के. वरु, डॉ. अनिल पाटील, डॉ. सुनिल मासाळकर, डॉ. आर. एम. पाटील हे मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे डॉ. विनय सुपे, डॉ. डी. टी. मेश्राम, जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषीतज्ज्ञ बी. डी. जडे, डॉ. अशोक मिश्रा, डॉ. बी. बी. ढाकरे, डॉ. एस. डी. पाटील, डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. अंकूश पडवळे, डॉ. अशोक वाळूंज, डॉ. निलेश गायकवाड, डॉ. डी. एन. कुलकर्णी, डॉ. चोवटीया, डॉ. अजित सिंग, डॉ. आर. के. पाल, बी. टी. गोरे, गोविंद हांडे, के. बी. पाटील, जनार्दन रोटे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याचजोडीला कुलदीप राऊत, आर. एस. श्रीकांत, भागवत पवार, राजेंद्र जठार, ज्ञानदेव चव्हाण, राहूल रसाळ या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे अनुभव उपस्थितांना ऐकण्यास मिळतील.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s