फलीच्या दोन दिवसीय सम्मेलनाची सांगता

ग्रामीण भागातील एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत  ‘फली’ उपक्रम पोहोचविण्यासाठी प्रयत्नरत राहू – अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन

सद्यस्थितीसह भविष्याचा वेध घेण्यासाठी जैन हिल्स हे प्रेरणास्थळ : नान्सी बेरी

जळगाव, ता. २४ : कृषी क्षेत्रातील सद्य:स्थितीला सक्षम पर्याय देण्यासह या क्षेत्राचे भविष्यातील नायक घडविण्यासाठी भवरलालजी जैन यांची कर्मभूमी, जैन हिल्स समर्थ असून आता हे एक शक्तीस्थळ झाल्याचे प्रतिपादन जागतिक बँकेच्या महिला विभागाच्या माजी प्रमुख तथा ॲक्शन प्लॅटफॉर्म’ च्या समन्वयिका नान्सी बेरी यांनी केले. भारतातील शेतीला भविष्यातही एक समर्थ नेतृत्व मिळावे या दृष्टीने जैन इरिगेशन, ॲक्शन प्लॅटफॉर्म, गोदरेज ॲग्रोव्हेट, महिन्द्रा राईज, युपीएल, स्टार ॲग्री आदींच्या संयुक्त विद्यमाने ‘फली’ च्या (फ्युचर ॲग्रीकल्चर लिडर्स ऑफ इंडिया) दोन दिवसीय संमेलनाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, गोदरेज ॲग्रोव्हेटचे डॉ. संजय ढोके, युपीएलचे प्रसून सरकार, स्टार ॲग्रीचे किशोर महाले आदी मान्यवर उपस्थित होते.

जागतिक पातळीवर फलीच्या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले असून यातूनच भविष्याला सावरणारे उत्तम प्रगतशील शेतकरी, कृषी क्षेत्रातील संशोधक, कुशल अधिकारी, कृषी उद्योजक निर्माण होतील असा विश्वास नान्सी बेरी यांनी बोलून दाखविला. कृषी क्षेत्रासमोर कितीही आव्हाने असली, तरी शाश्वत व्यवसायाचे अनेक मार्ग याच व्यवसायात दडलेले आहेत. शेतीचे तंत्र व त्याला पूरक असलेल्या उद्योगांचा अभ्यास करून जे जे या क्षेत्रात उतरले आहेत, त्यांनी आव्हाने असूनही अत्यंत लक्षणिय प्रगती साध्य केली आहे. शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन या उपक्रमामुळे अधिक सकारात्मक झाला असल्याचे त्यांनी सांगितले. आता फली विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासामुळे त्यांच्या शेतकरी पालकांचाही विश्वास द्विगुणित झाल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.

भविष्यातील शेतीसाठी शालेय शिक्षणापासूनच उच्च कृषी तंत्रज्ञानाचे बाळकडू मिळालेली पिढीच शेतीला आणखी उज्ज्वल करेल ही धारणा जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांची होती, हे लक्षात घेऊन आम्ही शेती, शेतकरी आणि ग्रामविकास यांच्या विकासासह जमीन, पाणी आणि वातावरण यात शाश्वतता विकसित व्हावी या दृष्टीने जागतिक पातळीवरील ‘वॉटर युनिव्हर्सिटी’साठी लक्ष केंद्रीत केल्याचे प्रतिपादन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. आजच्या या ‘फलीं’ना शालेय शिक्षणानंतर विद्यापीठस्तरिय शिक्षणासाठीही आम्ही जागतिक पातळीवर गुणवत्तेच्या दृष्टीनेही परिपूर्ण असलेल्या शिक्षणाच्या सुविधा इथे उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले. मोठी स्वप्न बघणारीच आजची मुले भविष्याला गवसणी घालून समाजासाठी मोठे भव्य दिव्य कार्य करू शकतात हा विश्वास गतवर्षी झालेल्या ‘फली’च्या पहिल्या संमेलनात भवरलालजी जैन यांनी तुम्हाला दिल्याची भावूक आठवण काढत त्यांनी त्यांच्या जीवनकार्याला मुलांसमोर अधोरेखित केले. त्यांनी जपलेली दूरदृष्टी आम्ही सतत डोळ्यापुढे ठेऊन फली उपक्रमाला अधिक विस्तारित कसे करता येईल याचा गंभीरतेने विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात बुद्धिबळ संघटनेच्या माध्यमातून ज्या प्रमाणे शालेय पातळीवर ‘चेस इन्‌ स्कूल’ चा उपक्रम पंचवीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला आहे, त्याच धर्तीवर फलीचा हा उपक्रम येत्या काळात ग्रामीण भागातील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू याचे सूतोवाचही श्री. जैन यांनी केले. शेतीचा शोध हा महिलांनी लावला. येत्या काळातही कृषी क्षेत्रात महिलांचे योगदान पुरुषांइतकेच महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेता फलीच्या उपक्रमात मुलींचा निम्म्याने असलेला सहभाग हा अत्यंत दिलासा देणारा आहे. राज्यात जवळपास एक लाखापेक्षा अधिक प्राथमिक शाळात आहेत. एवढ्या शाळांपैकी आपण आपल्या स्तरावर अठरा शाळांपुरता हा उपक्रम पथदर्शी म्हणून सुरू करू शकलो. लाखो विद्यार्थ्यांपैकी तुम्हा दीड हजार विद्यार्थ्यांना मिळालेली ही संधी यावरून तुम्ही भाग्यवान असल्याचा मला हेवा वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. या शाळांनीही आता तेवढ्याच जबाबदारीने अधिक परिश्रम घेण्याचेही आव्हान त्यांनी केले. यावेळी मुलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.

या संमेलनाच्या निमित्ताने ‘फली’ विद्यार्थ्यांसाठी कृषी व्यवसाय प्रकल्प नियोजन स्पर्धा, फली शोध स्पर्धा घेण्यात आली. शोध (इनोव्हेशन्स) स्पर्धेत नऊशे विद्यार्थ्यांचा सहभाग होता. २४० कृषी व्यवसाय प्रकल्पाचे विविध मॉडेल्स विद्यार्थ्यांनी तयार केले. यातील अठरा मॉडेल्स अंतिम स्पर्धेसाठी निवडण्यात आलेत. विद्यार्थ्यांच्या विविध गटांमार्फत ३६ व्यवसाय प्रकल्पाबाबत सादरीकरण करण्यात आले. यातील चांगल्या सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाच बक्षिसे ठेवण्यात आली होती. यातील पहिले बक्षिस भाजीपाला निर्जलीकरण प्रकल्प सादर करणाऱ्या वसतीगृह विद्यालय, खराटी, ता. बारामती यांनी पटकाविले. दुसरे बक्षीस खिरोदा येथील धनाजीनाना विद्यालयाने जैविक कंपोस्ट व जैविक कीटकनाशक व्यवस्थापनासाठी, तिसरे बक्षिस पिंपळगाव माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव बसवंत, नाशिकला द्राक्षाचे प्रक्रियायुक्त पदार्थांसाठी, चौथे बक्षिस विद्या विकास मंदिर, कडेढोण, सातारा शाळेला श्रीखंड उत्पादनासाठी, तर भालोद, जळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेला गुलकंद प्रक्रिया उत्पादनासाठी पाचवे बक्षिस देण्यास आले.

फली इनोव्हेशन स्पर्धेतील पहिले बक्षिस धुळे जिल्ह्यातील कसारे येथील खान्देश गांधी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या शेतीसाठी बहुउद्देशिय सौर यंत्राला, दुसरे बक्षीस मायनी, सातारा येथील भारतमाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सौर फवारणी यंत्राला, तिसरे बक्षीस हिंगोणे, जळगाव येथील प्रभात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘पुश स्प्रेअर’ यंत्राला, चौथे बक्षीस पोखरी पुणे येथील श्री पंढरीनाथ शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मल्चिंग पेपरला छिद्र पाडणाऱ्या यंत्राला, तर पाचवे बक्षीस भालोद येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या ‘प्लँटर मशीन’ तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आले. यावेळी सर्व फली विद्यार्थ्यांना फलीचे आकर्षक जॅकीट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

शेतीला अधिक आकर्षक स्वरूपात व्यवसायाच्या माध्यमातून कसे केले जाऊ शकते, हे फली उपक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विद्यार्थ्यांना शिकविले जात आहे. त्यांना कृषी आधारित विविध नाविण्यपूर्ण प्रकल्पाद्वारे स्वत:च्या अनुभवातून आत्मविश्वासावर शिकता यावे यासाठी विशेष भर दिला जातो.

fali

——-

फोटो कॅप्शन : फली विद्यार्थ्यांसमवेत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ॲक्शन प्लॅटफॉर्मच्या समन्वयिका नान्सी बेरी, गोदरेज ॲग्रोव्हेटचे डॉ. संजय ढोके, युपीएलचे प्रसून सरकार, स्टार ॲग्रीचे किशोर महाले, जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी सुनिल देशपांडे, डॉ. डी.एन. कुलकर्णी, डॉ. ए. व्ही. ढाके आदी.

२. फली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संशोधन प्रकल्पाची विद्यार्थ्यांकडून माहिती घेताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. ढाके, सुनील देशपांडे, आदी.

 

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s