जलयोगी : डॉ. भवरलाल जैन

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगावचे संस्थापक भवरलालजी जैन यांचे अल्पशा आजाराने २५ फेब्रुवारी २०१६ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणारा हा लेख.
या पृथ्वीतलावरील मानवी जगणे प्रामुख्याने दोन गोष्टींमुळे सुसह्य होते, सहज होते, आश्वासक होते. यातील पहिला भाग हा तपश्चर्येचा असतो. दुसरा भाग म्हणजे या तपश्चर्येतून मिळणारी दूरदृष्टी प्रत्यक्षात साकारण्यासाठी अहोरात्र स्वतःला वाहून घेणारी, त्याला कष्टाची जोड देणारी व्यक्तिमत्वं, ज्यांच्यामुळे मानवी जगणे सुसह्य होत जाते. भवरलालजी जैन यांनी आयुष्यभर मानवी कल्याणासाठीच्या तपश्चर्येला अहोरात्र कष्टांची जोड दिली. या कष्टातूनच हरितक्रांतीला पायाभूत ठरणारे उच्च कृषि तंत्रज्ञान या भूमित, या महाराष्ट्रात विकसित होऊ शकले. “कल्पना कणापरी ब्रह्मांडाचा भेद करी” हे ब्रीद त्यांनी प्रत्यक्षात साकार करून दाखविले.

भवरलालजी जैन यांना फार मोठा औद्योगिक घराण्याचा वारसा नव्हता. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याशा वाकोद गावातील सामान्य अशा घरात त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी जळगाव, नाशिक व मुंबई येथे घेतले. असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या भवरलालजींची राज्य लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली होती. शासकीय नोकरीची संधी झुगारून या व्यक्तिमत्त्वाने आपल्या आईच्या शब्दानुसार सरळ निसर्ग, पशू, पक्षी, प्राणी यांची कृषी क्षेत्रामार्फत सेवा करण्याचे निश्चित केले.
पाच दशकांपूर्वी कृषिक्षेत्रासमोरील आव्हाने, शेतकर्यांचे प्रश्न आजच्यापेक्षा अत्यंत निराळे होते. तांत्रिकदृष्ट्या ते आव्हानात्मक होते. केरोसीनवर चालणार्या पंपाचा जेमतेम आविष्कार झाला होता. याला लागणारे पाईप लोखंडी किंवा सिमेंटचे होते. लोखंडी परवडणारे नव्हते तर सिमेंटचे पाईप पावलोपावली फुटायचे. त्यांची जोडणी करण्यातच शेतकरी बेजार व्हायचे. अशा या काळात कृषि क्षेत्राला नवा तंत्रिक दिलासा आवश्यक होता. सर्वसामान्य शेतकरी असलेल्या भवरलालजी जैन यांनी ही समस्या लक्षात घेऊन शेतीच्या गरजेनुरूप, पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकर्यांना सोईचे ठरतील अशा पीव्हीसी पाईप्सचे उत्पादन सुरु केले. जोडणी करायला व हाताळणीसाठी पीव्हीसी पाईप्स सोपे असल्याने जैन इरिगेशनचे हे पहिले उत्पादन राज्याच्या प्रत्येक शेतकर्यांच्या वेशीपाशी जाऊन पोहोचले.

त्यांनी केवळ व्यावसायिकाची, उद्योजकाची भूमिका घेतली नाही. आपल्या उद्योगाला त्यांनी शाश्वत विकासाचे तात्विक अधिष्ठान दिले. माझ्या गावकुसाबाहेरचा सर्वसामान्य शेतकरी जर मोठा झाला तरच मी मोठा होईन ही खूणगाठ त्यांनी व्यवसायात पदार्पण करते वेळीच बांधून घेतल्याने आयुष्यभर त्यांनी स्वतःला याच कामी वाहून घेतले. छोट्यातला छोटा शेतकरी हा कसा मोठा होईल, त्याचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल याचा ध्यास घेऊन त्यांनी थोडे थोडके नव्हे तर सुमारे ५० लाख शेतकर्यांचे जीवनमान उंचावून दाखविले. ते  द्रष्टे आणि कर्मयोगी मानले जातात ते यामुळेच.
वाकोदसारख्या छोट्या गावातून पुढे येत आपल्या उद्योगाला विश्वाला बिलियन डॉलरची उलाढाल असलेली ग्रामीण बहुदेशीय कंपनी करणे तसे सोपे काम नाही. शेतीला लागणार्या पाईपापासून ते ट्यूबवेलच्या केसिंग पाईप पर्यंत, ऊतिसंवर्धित रोपांपासून ते ठिबक, सूक्ष्मसिंचन प्रणालीपर्यंत, फळ प्रक्रिया ते भाजीपाला निर्जलीकरण प्रक्रियेपर्यंत त्यांनी आपल्या उत्पादनांची एक विशाल-विस्तृत श्रृंखला सातासमुद्रापार पोहोचविली. एक मराठी उद्योजक सातासमुद्रापार आपल्या अस्तित्वाचा, आपल्या विस्ताराचा अमिट ठसा उमटवितो हे निश्चितच प्रत्येक महाराष्ट्रीयासाठी, भारतीयासाठी अभिमानास्पद आहे.

भारताचा भाग्यविधाता म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागेल. पाच दशकांपूर्वी खर्या अर्थाने कृषिक्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’चा पाया त्यांनी रचला. यातूनच जागतिक पातळीवर सर्वांधिक आंबा फळावर प्रक्रिया करणारी प्रथम क्रमांकाची कंपनी, ऊतिसंवर्धित फळांच्या रोपांची निर्मिती करून ही व्हायरस-फ्री रोपे उच्च तंत्रज्ञानासह शेतकर्यांच्या हाती सुपूर्त करणारी प्रथम कंपनी, सूक्ष्मसिंचन व ठिबक सिंचनातील दुसर्या क्रमांकाची कंपनी, सौर ऊर्जेवर चालणार्या स्वदेशी तंत्रज्ञानाची जोड देऊन, स्वदेशी तत्वाने सौर पंपाचे उत्पादन करणारी प्रथम क्रमांकाची कंपनी म्हणून त्यांनी मिळवलेला नावलौकिक हा देशाच्या उद्योग जगताचा गौरव करणारा आहे.

ऊतिसंवर्धित बायोटेक्नॉलॉजीचे महत्त्व त्यांनी ओळखले. जळगाव येथे संशोधनाला भक्कम करणारी सर्वात मोठी बायोटेक लॅब त्यांनी उभारली. या लॅबला शासनाचे एनएबीएल मानांकन सुरवातीपासून लाभले. जैन इरिगेशनने निर्माण केलेल्या टिश्युकल्चर केळीच्या ग्रॅण्ड नैन या व्हरायटीने शेतकर्यांचे जीवनमान उंचावले. खान्देशसारखा उष्णकटिबंधात मोडणारा जळगाव जिल्हा भारतात क्रमांक एकचा केळी उत्पादक जिल्हा म्हणून अल्पावधीतच नावारूपास आला. इथल्या केळीने देशाच्या सीमा तर तोडल्याच शिवाय पाकिस्तान सारख्या देशातही या केळीने आपला लौकीक प्रस्थापित केला. खान्देशच्या पट्ट्यात ज्या शेतकर्याने टिश्युकल्चर केळीला जवळ केले त्यांचे जीवनमान किती सुधारले ते त्यांच्या घरावरून आपल्या सहज लक्षात येते. भवरलालजींच्या दूरदृष्टीचे हे आणखी एक द्योतक आहे.

शेतकर्यांच्या भल्यासाठी ज्या काही गोष्टी असतील त्यावर संशोधन करणे व या संशोधनातून निर्माण केलेले तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचविणे हा त्यांच्या जीवन कार्यातील एक अविभाज्य भाग होता.

शेतकरी हे निरक्षर जरी असले तरी ते अज्ञानी नाहीत. त्यांना केवळ तंत्रज्ञानाप्रती सजग व साक्षर करणे आवश्यक आहे हे त्यांनी नेमकेपणाने ओळखले होते. या सजगतेतूनच अखंड भारतभर त्यांनी कृषि साक्षरतेचा यज्ञ मागील सुमारे ३ दशकांपासून सुरु केला. आजच्या घडीला भारताच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात त्यांनी कृषितज्ज्ञ नेमून त्यांच्यामार्फत शेतकर्यांना योग्य दिशा देण्याचे काम यशस्वी करून दाखविले.

हा कर्मयोगी शेवटच्या श्वासापर्यंत थांबला नाही. शेतकर्याची जी दिनचर्या असते ती शेवटपर्यंत त्यांनी पाळली. सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे, उठल्यावर प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन शेतातील मातीपिकांशी मूक संवाद साधणे, त्याच्याशी एकरूप होणे, यातूनच पुढील कामाची दिशा घेणे, कार्यालयीन कामकाजातून विशेष सवड काढून काही वेळ समाज कार्यासाठी देणे ही दिनचर्या सर्वसामान्यांसारखी ठेऊन या व्यक्तिने मानव कल्याणाचाच विचार कायम बाळगला.
प्रत्येकाने विविध रूपातून सामाजिक ऋणांची परतफेड केली पाहिजे याचा विसर पडू न देता काही तरी अगोदर मिळविले पाहिजे ही व्यवसायाची गुरु किल्ली त्यांनी इतरांना दिली. आपल्या व्यवसायाची उभारणी नैतिक अधिष्ठानावर करून त्यांनी नैतिकतेच्या धर्मालाच सर्वांपर्यंत पोहोचते केले. लहानपणी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे घेताना ज्या काही उणिवा भासल्या त्या लक्षात ठेऊन पुढील काळात त्यांनी योग्य वेळ येताच निवासी शाळेचे स्वप्न साकारण्यास सुरवात केली. जगातील जे चांगले शिक्षण आहे ते आपल्याच भागात विद्यार्थ्यांना मिळावे शिवाय या शिक्षणासमवेत त्यांच्यावर भारतीय संस्काराचीही पेरणी व्हावी, कार्यानुभवातून शेती मातीचेही गणित कळावे या दृष्टिने जळगावातच त्यांनी अनुभूती निवासी स्कूल सुरू केली. अवघ्या दोन वर्षातच ही स्कूल भारतातील ग्रीन स्कूल अवार्डने गौरविली गेली.

ज्या मुलांना केवळ दारिद्र्याच्या शापाने योग्य शिक्षण घेता येत नाही अशा दारिद्र्य रेषेखालील मुलांसाठी निदान आपल्या गावात तरी आपण काही केले पाहिजे यासाठी ते नेहमी अस्वस्थ व्हायचे. या अस्वस्थतेतूनच त्यांनी जळगाव येथे महानगर पालिकेच्या बंद पडलेल्या शाळेच्या ईमारतीत एक अभिनव स्कूल सुरु केली. या अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज जळगावमधील दारिद्र्यात खितपत असलेल्या शेकडो मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मोफत दिले जात आहे. येथील विद्यार्थ्यांनी साध्य केलेल्या गुणवत्तेने देशविदेशातील संस्थांचेही लक्ष वेधले गेले आहे. या शाळेत आता विदेशातील उच्च शिक्षण घेणारी बालकल्याण व शिक्षण विभागातील विद्यार्थी येऊन प्रात्यक्षिकाचे धडे गिरवून जातात.
ही मूर्ती तशी शरीराने लहान होती. मनिषा आणि उर्मी मात्र त्यांच्यात प्रचंड होती. या उर्मिवरच त्यांनी हृदय विकाराचे ७ अटॅक सहन करून दाखविले. या आजाराला ते कधीच बधले नाहीत. उलट यावर मात करण्यासाठी त्यांनी योग, निसर्गोपचार, ध्यानधारणा हे भारतीय संस्कृतिचे मार्ग अधिक जवळ केले. अद्ययावत वैद्यकीय उपचारांसह मूळ भारतीय संस्कृतितील या जीवनशैलीतून ते प्रत्येक प्रकल्पासाठी दुप्पट गतिने पुढे झेपावले. कंपनीच्या विस्तारासमवेत सामाजिक क्षेत्रातील त्यांनी निर्माण केलेली कामे ही अपरिचितांना नेहमी स्तिमित करून टाकतात. ते समाजसुधारक, विचारवंत म्हणून त्यांच्या लक्षात राहतात. महात्मा गांधींच्या जीवन कार्याला भारतातील नवीन पिढी समवेत संपूर्ण जगतालाही त्यांचा ‘बी द चेंज’चा संदेश घेता यावा यासाठी त्यांनी मागील एक दशक पूर्णपणे स्वतःला वाहून घेतले. या दशकातील चिंतनाला त्यांनी कृतिची जोड देऊन जळगाव येथे अवघ्या काही महिन्यात जागतिक पातळीवरचे गांधीतीर्थ उभे करून दाखविले. आज या फाउंडेशनमार्फत शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त घेतल्या जाणार्या गांधी विचार परीक्षेत सुमारे २ लाख विद्यार्थी सहभागी होतात. हे म्युझियम प्रत्यक्ष पाहणार्यांची संख्या आता हजारोंनी वाढते आहे.

एखादा सर्वसामान्य व्यक्ती आपल्या कार्यकर्तृत्वाने एवढा मोठा ठसा उमटवू शकते यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. ते केवळ द्रष्टे नव्हते. त्यांनी साहित्याचे क्षेत्रही कुशलतेने हाताळून सिद्धहस्त लेखक म्हणूनही आपली ओळख निर्माण केली. त्यांनी पत्नीच्या योगदानावर लिहिलेले ‘ती आणि मी’ या पुस्तकाच्या लाखाच्यावर प्रती मराठी मनाच्या घराघरात पोहोचल्या आणि आता इंग्लिश व हिंदी भाषांमध्येही उपलब्ध आहेत.

जैन हिल्स आणि जैन इरिगेशन हे चालते बोलते विद्यापीठच.  इथे ग्रामीण विकासापासून जलसंधारणापर्यंत, महात्मा गांधींच्या शाश्वत विकासापासून ते खेड्यातील साध्या शेतकर्यालाही समृद्धीचा मार्ग देणार्या उच्च तंत्रज्ञानापर्यंतच्या विविध शक्तींचे महात्म्य या जैन हिल्सला मिळाले. म्हणूनच की काय आपल्या गावकुसात राबणार्या शेतकर्यांचे पाय विठ्ठलाच्या पंढरी इतकेच जैन हिल्सच्या कृषिपंढरीकडे आपसुक वळतात. शेतकरी येथून उच्च कृषितंत्रज्ञानचे बळ घेऊच जातात. इथे भेट देणार्या कोणत्याही शेतकर्याला रिकाम्या हाताने परतू देणार नाही याचा ध्यासाने भवरलालजी जैन यांनी बाळगून गुरुकुल निमार्ण केले आहे.

कृषिक्षेत्रात शिकणार्या शेतकर्यांच्या मुलाकडे त्यांचे विशेष लक्ष असायचे. जैन इरिगेशनने जे काही संशोधन विकसित केले आहे ते पुढील शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांना खुले करून देताना त्यांनी कधीही व्यावसायिक विचाराला जवळ केले नाही. प्रत्यक्ष शेताच्या बांधावर पोहोचून त्या त्या भागातल्या मातीत रुजणारे संशोधन यावरच त्यांनी भर दिला. स्वाभाविक अनेक उच्च विद्या घेणार्या विद्यार्थ्यांचा याकडे कल असणारच. आपल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानाचा, येथील शिक्षणाचा लाभ व्हावा या उद्देशाने भारतातील जवळपास सर्वच कृषि विद्यापीठांनी स्वतःहून जैन इरिगेशनशी सामंजस्य करार केला. जगातील अनेक विद्यापीठांनीही करार करून कृषि क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी भारतात हे रुजलेले तंत्रज्ञान मोलाचे आहे याची अप्रत्यक्ष पावतीच दिली.

अमेरिकेतील हार्वर्ड बिझनेस स्कूलकडे संपूर्ण जग हे उच्च शिक्षणातील परमोच्च केंद्र बिंदू म्हणून पाहते. या हार्वर्ड बिझनेस स्कूलने भवरलालजी जैन यांनी आपल्या जीवन कार्यातून जो अमूल्य ठसा उमटविला त्या सर्व कार्याचा वेध घेणार्या विषयाचा त्यांच्या अभ्यासक्रमात समावेश केला हे सहसा कुणाला ज्ञात नाही. हा गौरव त्यांच्यामार्फत संपूर्ण भारताचा गौरव आहे. ज्या आफ्रिकेकडे भारताच्या खालोखाल एक अविकसनशील खंड म्हणून सारे जग पाहते त्या आफ्रिकेतील कृषिक्षेत्राला आपण दिलासा देऊ, मार्ग देऊ या उद्देशाने त्यांनी या दशकात मोठे कार्य केले आहे. आफ्रिकेतील विविध देशात कृषि शिक्षण विस्ताराचे कार्य त्यांनाही बळ देत आहे. ही दूरदृष्टी भवरलालजींनी व्यावसायिक गणितात कधीच गृहित धरली नाही. उलट यात झळ सोसून तयारी दर्शविली हे लक्षात घेतले पाहिजे.

कोणतेही राष्ट्र खर्या अर्थाने उभे रहायचे असेल तर त्याच्या सार्वजनिक व्यवस्थेत सर्वच पातळ्यांवर पारदर्शकता हवी ही भूमिका त्यांनी सुरवातीपासून घेतली. या त्यांच्या भूमिकेमुळे स्वतःच्या उद्योगावर होणार्या परिणामांचा त्यांनी विचार केला नाही. दोन दशकांपूर्वी लोकशाही मूल्यात माहितीच्या अधिकारासारख्या झाकून ठेवलेल्या महत्त्वपूर्ण अधिकाराला बाहेर काढून त्यांनी त्यासाठी आपली जाहीर भूमिका घेतली. माहितीचा अधिकार हा भ्रष्टाचाराला रोखणारा आहे हे लक्षात घेऊन त्यांनी समाजात जागृती केली. ‘आजची समाजरचना..’ या पुस्तकात त्यांनी घेतलेली भूमिका ही आजही आवश्यक अशी आहे.

ज्या काही भूमिका त्यांनी आजवर घेतल्या त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचा अट्टहासही त्यांनी स्वतःच स्वतःजवळ धरला. ज्या ग्रामसुधारणाचे भाष्य त्यांनी केले त्याची अंमलबजावणी त्यांनी काही खेडे दत्तक घेऊन केली. मराठवाड्यातील दुष्काळ निवारण्याच्या उद्देशाने प्राथमिक स्तरावर जिल्हा प्रशासनासमवेत दोन वर्षांपूर्वी ४० गावांमध्ये काम करून बीड जिल्ह्याला वेगळा दिलासाही दिला. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिने त्यांनी रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त निलीमा मिश्राला सोबत घेऊन प्रायोगिक पातळीवर सुमारे १० गावांतील महिला बचत गटांसाठी काही प्रायोगिक प्रकल्पही हाती घेतले.

पाण्याचे दुर्भिक्ष आणि बदलता निसर्ग ही आव्हाने भवरलालजी जैन यांनी डोळ्यापुढे ठेऊन कोरडवाहू शेतकर्यांसाठी जलसंधारणाचा नवा आयाम विकसीत केला. वॉटरशेड, वॉटर हार्वेस्टींग, वॉटर कंझर्वेशन आदिंचे पथदर्शक काम जैन हिल्स येथे मोठ्या नावीन्यपूर्णतेने करण्यात आले. कृषि क्षेत्रातील, जल व्यवस्थापन, उच्च कृषितंत्रज्ञान, सूक्ष्मसिंचन आदी क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल त्यांना जगात अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणार्या जागतिक पातळीच्या क्रॉफर्ड रीड मेमोरियल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. याच बरोबर जगातील विविध ४ विद्यापीठांनी त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचरने सन्मानित केले आहे. २००८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरविले.
जैन हिल्स ही कर्मयोध्ध्याची भूमि ठरली ती यामुळेच. इथे जे कोणी येऊन भेटून गेले त्यांना इथे केवळ प्रगतीची बिजेच मिळाली नाहीत तर याच्या जोडीला शाश्वत विकासाचा आध्यात्मिक मार्गही त्यांना सापडला.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती या जळगावला आल्या होत्या. या पृथ्वीतलावर अनेक अवतार होऊन गेले. यात कर्म अवतार याचे सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही पुरुष हे आपले अलौकिक कार्य करण्यासाठीच पृथ्वीतलावर येतात. या शब्दात त्यांनी भवरलालजींबद्दल गौरोद्गार काढले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी कर्मयोग्याच्या रुपात पाहिले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांना द्रष्ट्या पुरुष रुपात पाहिले. जे निरीश्वरवादी होते त्यांनी भवरलालजींना संत रुपात पाहिले.

ग्रामसुधारणेसाठी संत गाडगे महाराज यांनी हाती झाडू घेऊन ग्रामस्वच्छतेचा नारा गावोगावी पोहोचविला. ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नैतिक अधिष्ठानाची व कर्मकांडापल्याड प्रत्यक्ष साध्या छोट्या कृतिसाठी प्रत्येक खेड्याला जागे केले. विनोबा भावे यांनी भूदान चळवळीतून भूमिहिनांना भूमी मिळवून दिली. यांच्या जोडीला जोड देऊन भवरलालजींनी या सर्व राष्ट्रसंतांच्या जीवन कार्याला जवळ करत जलबचतीचे नवे अधिष्ठान निर्माण केले. पाण्याच्या प्रत्येक थेंबाला नवी परिभाषा देणार्या भवरलालजींना महाराष्ट्रातील शेतकरी नेहमी संताच्या रूपात लक्षात ठेवेल.

स्व. भवरलालजींच्या जीवनकार्याचा हा आलेख जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांनी ७९ वर्षाच्या आयुष्यात हे कसे साध्य केले याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या कामाची गती अफाट होती. कोणत्याही आव्हानाने ते डगमगले नाहीत. त्यांच्या प्रत्येक कृतीत धाडस होते. हाती घेतलेल्या कोणत्याही कामात ते एकाग्रता साधून कामे तडीस नेत. त्यांच्या अंगी असलेली ही गुणवैशिष्ट्ये त्यांच्या अशोक, अनिल, अजित, अतुल या चारही सुपुत्रांत बिंबलेली आहेत. स्व भाऊंच्या जीवनकार्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांचे कार्य पुढे समर्थपणे नेण्यास त्यांची पुढची पिढी सक्षम आहे हे निश्चित.

– विनोद रापतवार

——————

जैन इरिगेशन संबंधी :
जगभर पसरलेल्या २८ उत्पादन केंद्रामध्ये, १०,००० पेक्षा अधिक सहकारी कार्यरत असलेल्या जैन इरिगेशन सिस्टम्स् लिमिटेड (JISL) या आमच्या बहुराष्ट्रीय भारतीय कंपनीचे बोधवाक्य आहे, कल्पना कणापरी, ब्रह्मांडाचा भेद करी. गेल्या ३४ वर्षांपासून आम्ही सूक्ष्म जलसिंचन प्रणाली, PVC पाइप्स, HDPE पाइप्स, प्लास्टिक शीट्स यांचे उत्पादने प्रक्रियाकृत कृषि उत्पादने, पुनुरुज्जीवनक्षम ऊर्जा उपाय, ऊति संवर्धन सुविधा केंद्रे, वित्तीय सेवा, तसेच अन्य कृषि योगदान क्षेत्रांत ही कंपनी कार्यरत आहे. हिने आधुनिक सिंचन प्रणाली व मौल्यवान पाण्याची बचत करणार्या नवनवोन्मषी कल्पक तंत्रज्ञानांच्या विकासातून कोट्यावधी छोट्या शेतकर्यांच्या उत्पादनात व उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्यास मदत करून उत्पादनक्षमतेतील एक मूक क्रांतीच प्रवर्तित केली आहे; तसेच लार्ज स्केल इंटिग्रेटेड इरिगेशन प्रोजेक्ट्स (IIP) म्हणजेच विशालकाय एकत्रिकृत सिंचन प्रकल्पांच्या नव्या संकल्पनेची नांदीही केली आहे. जल आणि खाद्य सुरक्षेबाबत अधिक पीक-थेंबागणिक हे या कंपनीचे धोरण आहे. सार्थक करुया जन्माचे। रुप पालटू वसुंधरेचे॥ हे आमचे स्वप्न साकार करताना JISL ची सर्व उत्पादने आणि सेवा, शाश्वत भविष्य निर्माण करण्यात योगदान देतात. JISL ची NSE- मुंबई मधे JISLJALEQS अशी आणि BSE मध्ये ५००२१९ या सांकेतिक क्रमांकाने नोंद केलेली आहे. कृपया आम्हाला, www. jains.com या संकेतस्थळावर भेटा.
***

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s