जैव, माहिती आणि नॅनो तंत्रज्ञानाच्या वापरातच शेती व शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग एस. के. पट्टनायक, केंद्रिय सचिव, कृषी मंत्रालय, भारत सरकार

जळगाव, दि. 28 (प्रतिनिधी) – भारतातील कृषी क्षेत्रासमोर यापूर्वीही अनेक आव्हाने आली. त्या- त्या काळात आलेल्या आव्हानांवर मात करुन कृषी क्षेत्राने अन्न सुरक्षिततेमध्ये स्वयंपूर्णता साध्य करुन दाखविली. आता दुष्काळाच्या माध्यमातून पाण्याचे व वातावरणातील बदलाचे कृषी क्षेत्रासमोर आव्हान आहे. हे आव्हान परतवून लावण्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर, कमी पाऊस असलेल्या भागात जलसंधारण व शेततळ्यांची निर्मिती आणि जे पाणी आहे त्याच्या योग्य वापरासाठी सूक्ष्मसिंचनाचा कटाक्षाने वापर करणे क्रमप्राप्त झाल्याचे प्रतिपादन केंद्रिय कृषी विभागाचे सचिव एस. के. पट्टनायक यांनी केले. गांधीतीर्थ येथील सभागृहात आयोजित भविष्यातील आव्हानांचे स्वरुप आणि कृषीक्षेत्रातील पर्याय या विषयावरील जागतिक परिषदेच्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. ए. श्रीवास्तव, डॉ. ए. आर. पाठक, डॉ. राजेंद्र एस. परोडा, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, डॉ. पी. एल. गौतम, डॉ. डी. पी. रे, श्रीमती बिमला सिंग, डॉ. एच. पी. सिंग उपस्थित होते. लेफ्टनंट अमितसिंग मेमोरियल फाऊंडेशन, जैन इरिगेशन सिस्टीम्स्‌ लि. ए. एस. एम फाउंडेशन, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या प्रेम जागृती संगोष्ठी अंतर्गत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.DSC_4234_Edited

Photo Caption – परिषदेचे उद्‌घाटन करताना डॉ. राजेंद्र एस. परोडा, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, कृषी मंत्रालयाचे सचिव एस. के. पट्टनायक, डॉ. ए. श्रीवास्तव, डॉ. ए. आर. पाठक, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, डॉ. पी. एल. गौतम, डॉ. डी. पी. रे, श्रीमती बिमला सिंग व मान्यवर

जलसुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने दुष्काळग्रस्त भागात सुमारे पाच लाख शेततळे आणि विहिरींची अर्थसंकल्पात तरतूद केली असून मनरेगा अंतर्गत ही योजना आहे. सिंचनाच्यादृष्टिने केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले असून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना एका ध्येयाने राबविली जाणार असून यात सुमारे साडेअठ्ठावीस लाख हेक्टर जमिन सिंचनाखाली आणली जाईल असे एस. के. पट्टनायक यांनी सांगितले. यासाठी या आर्थिक वर्षाकरिता दोन हजार तीनशे चाळीस कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर एआयबीपी योजनेर्तंगत सुमारे ८९ प्रलंबित योजना मार्गी लावून याद्वारे येत्या ५ वर्षात ८०.६ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हरितक्रांती व दुग्ध उत्पादनातील क्रांती साध्य करुन दाखविली आहे. आता असलेली आव्हाने कठीण असली तरी त्यावर सहज मात करण्याजोगी आहेत. ही आव्हाने पेलविण्यासाठी आता कृषी क्षेत्रात जैव तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक असल्याचे पट्टनायक यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी आता कृषी योजना, त्याची रुपरेषा व अंमलबजावणी याच्या योग्य सांगडद्वारे उत्पादनवाढीवर अधिकाधिक भर देण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न येत्या ६ वर्षात दुपटीने कसे वाढेल यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे. शेतीसमवेत दुग्धव्यवसाय, मदुमक्षिका पालन, पशूपालन, कुकुटपालनसारख्या शेतीपूरक उद्योगांना केंद्र सरकारतर्फे चालना दिली जात आहे. याचबरोबर उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लागवडीचा खर्च कमी करणे, प्रति एकरी उत्पादनात वाढ आणि शेतकऱ्यांनी पिकविलेल्या उत्पादनाला रास्त भाव ही त्रिसुत्री आता शासनाने निर्धारित केल्याचे पट्टनायक यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रात आज नेमकी दोन टोक आपणास पाहावयास आढळतात. एका बाजूला प्रगतीशील शेतकरी ठिबक, सूक्ष्मसिंचनसारख्या उच्चकृषी तंत्रज्ञानाद्वारे शेतीतून लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत तर दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानापासून दूर असलेले शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे चित्र आहे. जे शेतकरी विकासाच्या परिघात येऊ शकले नाहीत त्या शेतकऱ्यांना आपण प्रगतीच्या प्रवाहात आणून त्यांना चांगले जीवन, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान कसा देऊ हा प्रश्न अधिक मोलाचा असल्याचे जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले. यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत उच्चकृषी तंत्रज्ञान पोहोचविणे हाच मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उच्चकृषी तंत्रज्ञानात जैन इरिगेशनने आजवर महत्त्वपूर्ण योगदान दिले असून हे तंत्रज्ञान सक्षम असल्याचे गौरवोद्‌गार डॉ. आर. एस. परोडा यांनी काढले. शेतकऱ्यांनी सर्व आव्हानांवर मात करावी यासाठी शास्त्रज्ञ अहोरात्र मेहनत घेत असतात. आजचा काळ शेतीसाठी अधिक आव्हानात्मक जरी असला तरी शेतकऱ्यांना चांगला मार्ग कसा देता येईल यासाठीच ही परिषद असल्याचे ते म्हणाले. डाळीमध्ये स्वयंपूर्ण होण्याची आपल्यात क्षमता असून यासाठी शेतकऱ्यांनी डाळ उत्पादनाकडे वळून त्यावर ठिबक व सूक्ष्म सिंचनाचा जरुर उपयोग वाढवावा असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.

कृषी क्षेत्राच्या सर्वांगिन प्रगतीसाठी शेतकरी व शास्त्रज्ञ मिळून एकत्र चर्चा व्हावी, यातून शेतकऱ्यांना प्रगतीचे नवे मार्ग मिळावेत या उद्देशाने ही परिषद आम्ही मागील सात वर्षांपासून घेत असल्याचे सीएचएआयचे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग यांनी सांगितले. आज शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बदलत्या वातावरणानुसार कोणती पिके घ्यावीत यापासून पिकाचे आरोग्य व्यवस्थापन, शेतातील मृदव्यवस्थापन, जलव्यवस्थापन या बाबीवर तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार असून ही परिषद खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल असा विश्वास डॉ. एच. पी. सिंग यांनी व्यक्त केला.

उद्‌घाटन समारंभात यावेळी राणी दुर्गावती विद्यापीठ जबलपूरचे माजी कुलगुरु डॉ. एस. एम. पॉल खुराणा यांना कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडियातर्फे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. ट्रस्ट फॉर ॲडवॉन्समेंट ऑफ ॲग्रीकल्चरल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र एस. परोडा यांना चीफ पॅट्रॉन ॲण्ड ऑनर्ड फेलो म्हणून सन्मानीत करण्यात आले. केंद्र सरकारचे कृषी सचिव एस. के. पट्टनायक, कुलगुरु प्रो. ए. के. श्रीवास्तव यांना ऑनर्ड फेलो देऊन गौरविण्यात आले.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s