ऊसाला ठिबकसाठी सर्वांनीच आग्रही राहणे गरजेचे- अनिल जैन ऊसाचेही टिश्युकल्चर रोपे येत्या दोन वर्षात जैन इरिगेशन उपलब्ध करणार

जळगाव, दि. 4 ( प्रतिनिधी) –ऊस पिकाबद्दल पाण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रात व्यापक चर्चा सुरु आहे. ती चर्चा करताना आपण या ऊस पिकानेच राज्याला 2 कोटी रोजगार निर्मितीची क्षमता व लाखों शेतकऱ्यांना शेतीतील उत्पन्नाबद्दल विश्वासार्हता दिल्याचे लक्षात घेतले पाहिजे. मोकाट पाण्यावर ऊस घेतल्यास पाण्याचा अपव्यय होणारच आहे. याचे आम्ही समर्थन करणार नाही परंतु या शेतकऱ्यांना उच्च कृषि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस पिकाचे उत्पादन घेण्यास आपण सर्वांनी चालना दिली पाहिजे असे आवाहन जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी केले. महाराष्ट्र व कर्नाटक राज्याने ऊस पिक शंभर टक्के ठिबकखाली आणण्याचे धोरण स्वीकारले असून याला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चालना दिली आहे. केंद्रसरकारने या बाबत शासकीय पातळीवरून स्पष्ट निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.

जैन हिल्स, गांधी तीर्थच्या कस्तुरबा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ऊस विकास कार्यशाळेचे उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी भारतातील ज्येष्ठ ऊस डॉ. डी.जी. हापसे, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, विपणण संचालक अभय जैन, बारामती अॅग्रोचे श्री. गुळवे, प्रगतशील शेतकरी संजीव माने, राज्यातील सुमारे 100 पेक्षा अधिक साखर कारखान्यांचे 175 प्रमुख कृषि विकास अधिकारी सहभागी झाले आहेत.

आपल्याकडील जमीन, हवामान, ऊस पिकासाठी अत्यंत पोषक आहे. जगात सर्वाधिक 175 टन एकरी ऊसाचे उत्पादन सांगली जिल्ह्यातील रुपेश पाटील या शेतकऱ्याने घेतले. या खालोखाल अमोल लाखेसर व अनेक शेतकऱ्यांनी 100 टना पेक्षा अधिक ऊस उत्पादन घेऊन आपला जागतिक वरचश्मा सिद्ध केला. संजीव माने यांनी गत 10 वर्षांपासून एकरी 100 टनापेक्षा अधिक उसाचे उत्पादन घेतल्याबद्दल त्यांना हावर्ड विद्यापीठाने, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सन्मानीत केल्याचे अनिल जैन म्हणाले. जैन इरिगेशनच्या उच्च कृषि तंत्रज्ञानातून या शेतकऱ्यांनी जे यश संपादन केले त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. भारतीय शेतकऱ्यांच्या योगदानामुळेच भारताकडे बघण्याचा सबंध जगाचा दृष्टिकोन आता सन्मानजनक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या घडीला राज्यात 20 टक्के ऊस पिकाचे क्षेत्र ठिबक खाली असून येत्या 3 वर्षात ते 80 टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे आव्हान पेलण्यासाठीच ही परिषद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी शेती, शेतकरी आणि शाश्वत विकास यासाठी स्वतःचे सबंध आयुष्य वेचले. त्यांच्या प्रयत्नांतूनच जगात पहिल्यांदा आपण 1988 मध्ये ऊसाला ठिबक देऊ शकलो. त्यावेळी हवाई व इतर बोटावर मोजण्या एवढ्या देशात ठिबकवर ऊस होता. तेव्हापासून आपण राज्यातील पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन ऊसाला ठिबक साठी आग्रही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाण्याचे मोल लक्षात घेऊनच आपण ठिबक पाठोपाठ टिश्युकल्चर तंत्रज्ञानाकडे वळलो. आजच्या घडीला टिश्युकल्चर केळीच्या वार्षिक 6 कोटी रोपांचा टप्पा आपणं ओलांडला आहे. प्रत्येक झाडागणीक आता शेतकऱ्यांना सुमारे 35 किलोचा घड घेता येणे शक्य झाले आहे. केळी पाठोपाठ डाळिंब, पेरू, स्ट्रॉबेरी आदी फळांचे टिश्युकल्चर रोपे विकसित केली. यातून शेतकऱ्यांनी साध्य केलेली प्रगती लक्षात घेऊन लवकरच पाण्याच्या नियोजनासाठी सोयीचे ठरेल असे ऊसाची टिश्युकल्चर रोपेही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करू असा विश्वास अनिल जैन यांनी व्यक्त केला.

ऊस पिकाबाबत वस्तुस्थितीचा विपर्यास नको- डॉ. डी.जी. हापसे

ज्या काळात शेतकऱ्यांना शेतीच्या व्यवसायिकतेचे गणित माहिती नव्हते त्या काळात ऊस पिकातून शेतकऱ्याने पहिल्यांदाच आर्थिक प्रगतीची फळे चाखली. राज्यात ऊस आज रुजलेला नाही. अनेक दशकांपासून तो ज्या ठिकाणी पाणी आहे त्या शेताच्या बांधांवर रुजलेला आहे. ज्या ऊसाने ग्रामीण भागाला अधिक संपन्न केले त्या ऊस पिकाबाबत आजच्या घडीला पाण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने अव्हेरले जाते त्याचे समर्थन होऊ शकत नाही. ऊस पिकाबाबत वस्तुस्थितीचा विपर्यास न करता उलट आता कटाक्षाने ठिबकवर ऊस घेण्यासाठी आग्रही असले पाहिजे असे डॉ. डी.जी. हापसे यांनी स्पष्ट केले.

ऊसाकडे केवळ एक पीक म्हणून बघणे शास्त्रोक्त नाही. याच्या चिपाडापासून ते साखर गाळून उरलेल्या मळीपर्यंत या पिकाची उपयोगिता आहे. याच्या बग्यासपासून विज निर्मिती आपल्याच राज्यात काही ठिकाणी होते. रुंद सरी पद्धत वापरून आता कडधान्य व तेलबिया आंतरपिके घेतले पाहिजे. जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यासाठी यापुढे आता कटाक्षाने मोकाट पाण्याचा वापर थांबवून शेतकऱ्यांनी ठिबकवर उसाच्या शेतीला प्राधान्य दिले पाहिजे याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.  या एका पिकाभोवती अनेक प्रक्रिया उद्योग सामावलेले आहेत.

दिवसभर होणाऱ्या विविध सत्रात ठिबक सिंचन व ऊस लागवड या विषयावर वरिष्ठ कृषितज्ज्ञ विजय माळी, सबसरफेस ड्रीप इरिगेशनवर वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. पी. सोमण, ठिबक तंत्रज्ञानावर प्रोडक्ट डेव्हलपमेंट विभागाचे उपाध्यक्ष अभिजित जोशी, खत व्यवस्थापनावर वरिष्ठ कृषितज्ज्ञ बी.डी. जडे, ड्रीप ऑटोमायझेशन तंत्रज्ञानावर संजय पाटोळे, लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्टवर प्रकल्प विभागाचे उपाध्यक्ष एस.पी. जाधव, ऊसाच्या शाश्वततेसाठी सब सॉईल ड्रेनेजवर वरिष्ठ अधिकारी डॉ. मधुसुदन चौधरी, ऊसाचे 100 मे.टन एकरी उत्पादनावर प्रगतशील शेतकरी संजीव माने आदी तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s