स्व. भवरलालजी जैन यांचे हजारोंनी घेतले अंतिम दर्शन

शनिवारी दुपारी 3.00 वाजता जैन हिल्स येथेशासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जळगाव, दि 26. (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री भवरलालजी जैन यांना शेवटचे डोळे भरून पाहण्यासाठी जैन इरिगेशनचे सहकारी, शेतकरी आणि अनेक मान्यवर व्यक्तींनी अंतिम दर्शन घेत अश्रुंना वाट मोकळी केली. 26 रोजी सकाळी 8 वाजेपासून आबाल वृद्ध, स्त्री-पुरुषांनी अंतिम दर्शन घेतले. शेती शेतकरी आणि गांधी विचारातील ग्रामीण विकास या त्रिवेणी संगमासाठी उभे आयुष्य वेचत भारतासाह जगभरातील शेतकऱ्यांना ठिबक आणि उच्चकृषी तंत्रज्ञानाद्वारे पाणी बचतीसह समृद्ध शेतीचा मंत्र देणारे कृषी साधक भवरलालजी जैन यांचे 25 रोजी मुंबई येथे सायंकाळी 4 .00 वाजता निधन झाले ही वार्ता समजल्यावर अनेकांची जैन हिल्स येथे अंतिम दर्शनासाठी रांग लागली होती. शनिवारी 27 रोजी दुपारी 3.00 वाजता जैन हिल्स येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दरम्यान 25 रोजी पहाटे साडेचार वाजता भवरलालजी जैन यांचे पार्थिव जळगाव येथे आणण्यात आले. बांभोरी येथील प्रकल्प प्लास्टिक पार्क, जुनी पाईप फॅक्टरी, पोलन पेठ, जैन शॉप, जळगाव येथील त्यांचे पूर्वीचे घर रमेश सदन, तसेच राहते घर जैन हाऊस येथे काही काळ दर्शनासाठी ठेऊन त्यांच्या नेहमीच्या वाहनाने जैन हिल्स येथे सकाळी आणण्यात आले.

उद्या 27 रोजी (शनिवारी) सकाळी 9.00 ते 12.00 या दरम्यान आकाश मैदानावर पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 12 वाजता जैन हिल्स येथील गौरी या निवासस्थानी पार्थिव नेण्यात येईल. तेथे परिवारातील सदस्य, नातलग-कुटुंब यांच्या उपस्थितीत पारंपरिक विधी होतील. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा 2.30 वाजता निघेल. ज्या शेतात विविध प्रयोग करुन नाविन्याचा मंत्र त्यांनी दिला त्या जैन हिल्सच्या प्रात्यक्षिक भूमीवर त्यांच्यावर दुपारी ३ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

 अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था

अंत्य संस्कारासाठी येणाऱ्यांची मोठी संख्या विचारात घेऊन शिरसोली रस्त्यावरील जैन हिल्स समोरील हिरा बाग येथील मैदानावर चार चाकी, दुचाकी वाहनांसाठी पार्कींगची सोय करण्यात आलेली आहे. तेथून समोरच असलेल्या जैन हिल्स च्या गेट क्र. 1 मधून अंत्यसंस्कार स्थळी जाणे सोईचे होणार आहे.

मान्यवरांनी घेतले अंतिमदर्शन

26 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 8 दरम्यान अंतिमदर्शनासाठी आकाश मैदानात त्यांचे पार्थिव ठेवले गेले. शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी सौ. रुबल अग्रवाल, जिल्हा पोलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, माजी आमदार, उद्योजक, साहित्यिक यांच्यासह कंपनीच्या सहकाऱ्यापासून तर शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. यात जळगावच्या महापौर राखीताई सोनवणे, मनपा आयुक्त संजय कापडणीस, मनपाचे नगरसेवक, पदाधिकारी, तहसीलदार गोविंद शिंदे, प्रांताधिकारी अभिजित भांडेपाटील, अॅडीशनल डीएसपी नंदकुमार ठाकूर, उप विभागीय पोलीस अधिकारी महादू पाटील, भवरलालजी जैन यांचे मित्र, कविवर्य पद्मश्री ना. धों. महानोर, डॉ. सुभाष चौधरी, माजी आमदार अरुणभाई गुजराथी, शाकाहार सदाचारचे प्रणेते रतनलालजी बाफना, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू सुधीर मेश्राम, राजूदादा पवार, करीम सालार, शांतिलालजी कोठारी, विजयकांत कोठारी, आ. गुलाबराव पाटील, अॅड. रविंद्र भैय्या पाटील, संदीप रवींद्र पाटील, माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, जेडीसीसी बँकेंचे संचालक संजय पवार, विष्णु भंगाळे, सचिन नारळे, विष्णु भंगाळे, माजी परिवहन मंत्री मा. आ. गुलाबराव देवकर, राजेश जैन, मॅगसेसे पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या निलीमा मिश्रा, शिवचरित्र, इतिहास अभ्यासक दादा नेवे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, डॉ. राजेंद्र फडके, ज्येष्ठ गांधीवादी डॉ. सुगन बरंठ, मा. आ. आर. ओ. तात्या पाटील काही परदेशी पाहूणे यांच्यासह असंख्य मान्यवरांनी अंतिम दर्शन घेतले.

अन् सर्वाना बांध आवरणे झाले कठीण…

वास्तविक पाहता सर्वांचे मोठे भाऊ अर्थात जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांना उपचारासाठी दुसऱ्यांदा मुंबई येथे हलविल्यानंतर जैन इरिगेशनचे सर्वच सहकारी भावुक झाले होते. दर दोन दिवसानंतर त्यांच्या आरोग्याच्या स्थितीविषयी वेळोवेळी सर्व सहकाऱ्यांपर्यंत माहितीही पोहचवली जात होती. सर्वांच्या सोबत काम करणारे आपले मोठे भाऊ लवकर बरे व्हावेत यासाठी प्रत्येकातर्फे आपापल्या धर्मानुसार प्रार्थनाही केल्या जात होत्या. दि. 25 फेब्रुवारी रोजी दुपारी मोठे भाऊ गेल्याची बातमी धडकल्याने सर्व शोकाकुल सागरात बुडाले. ज्या अहोरात्र कष्टातून मोठ्या भाऊंनी कंपनीचे एकेक प्रकल्प उभे केले त्या प्रत्येक प्रकल्पातील सहकाऱ्यांना भाऊंचे दर्शन हवे होते. असंख्य सहकार्यांना आपल्या भावभावनांना आवरता आले नाही. जन्मगाव वाकोदच्या शेजारी असलेल्या पळसखेडचे जिवलग मित्र निसर्गकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांनी आवरायचा प्रयत्न करूनही आपला बांध मोकळा केला.

भाऊ, जिव्हाळ्याचा शब्द असा गोड दिला..

केशरात न्हाला जीव सारा

अंतरात आता लक्ष लक्ष ज्योती

तुम्हा शेजारती पापणीत…

या शब्दात ना. धों. महानोर यांनी आपल्या फेसबुकवरील पेजद्वारे भावनेला वाहते केले. भाऊंपेक्षा वडील असलेले त्यांचे चुलते सेवादास दलुभाऊ जैन हेही सकाळी भाऊंच्या प्रतिक्षेत होते. भाऊ उठो ना! अशी आर्त साद घालत त्यांनी वातावरणाला भावुक केले. भाऊ आपल्यातच असून येथील पानाफुलात, झाडात, पक्षात ते आपल्या सोबत सदैव आहेत. सर्वांनी खचून न जाता त्यांनी दिलेला हा शाश्वत विकासाचा वसा आपण सर्व जण जपण्याचा प्रयत्न करुयात असे आवाहन केले. भाऊंना जेव्हा केव्हा मी प्रार्थनेसाठी आवाहन करायचो तेव्हा भाऊ आहे त्या स्थितीत हात जोडून पाठासाठी पुढे सरसवायचे, असे सांगत त्यांनी पाठाच्या माध्यमातून आदरांजली दिली.

—    Download Images

 

 

 

2 thoughts on “स्व. भवरलालजी जैन यांचे हजारोंनी घेतले अंतिम दर्शन

  1. A great selfless son of India who served farmers and showed how the multidisciplinary approach in irrigation profession can stabilise farming. He used latest in bio-technology to improve the lot of the farmers. It was a pilgrimage for me to visit Jalgaon as a member of the Environment and Sustainability Committee of Coca-Cola, and see his work on the ground. May God grant peace to his soul and fortitude to the family to bear this great loss.

    Like

Leave a comment