शेतीतील तण व्यवस्थापनासाठी ठिबक तंत्राचाच प्रभावी उपयोग

जळगाव, ता ३० : पिकातील तणाचे व्यवस्थापन करण्यासाठी ठिबकसारख्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत व प्रभावी असून याद्वारे तणांचे ७० टक्केपर्यंत नियंत्रण होते. शेतकऱ्यांची एरवी तण व्यवस्थापनात होणारी दमछाक व खर्च टाळण्यासाठी ठिबक प्रणाली अधिक निसर्ग पूरक असल्याने यासाठी पुढाकार घेण्याची गरज राष्ट्रीय तण व्यवस्थापनावरील वार्षिक आढावा बैठकीत झालेल्या विचारमंथनातून शास्त्रज्ञांनी बोलून दाखविली. जबलपूर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन परिषदेच्या तण व्यवस्थापन संचालनालयाची जैन हिल्स येथे आयोजित २३ व्या वार्षिक आढावा बैठकीचा आज समारोप झाला. भारताच्या विविध राज्यांतील कृषी शास्त्रज्ञ आणि संशोधक या बैठकीत सहभागी झाले होते.

शेतातील तणांचे नियंत्रण हा शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा आणि अत्यंत आवश्यक असा विषय समजला जातो. दरवर्षी कोट्यवधी रुपये तणनियंत्रणावर खर्च होतात. शेतीसोबत, सर्वसामान्य लोकांनाही ॲलर्जी, त्वचारोगासारखे आजार तणांमुळे होतात. यावर सक्षम उपायासाठी राष्ट्रीय कृषी संशोधन परिषदेचे जबलपूर येथे स्वतंत्र तण संशोधन संचालनालय असून त्याअंतर्गत संशोधन केले जाते.

दिनांक २८ ते ३० एप्रिल कालावधीत चाललेल्या या बैठकीचे उदघाटन जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी व संशोधक डॉ. सुब्रमण्यम यांच्या हस्ते करण्यात आले. जबलपूर येथील राष्ट्रीय तण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. ए. आर. शर्मा, राष्ट्रीय तण संशोधन संचालनालयाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. शोभा सोंधिया, जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषीविशेषज्ञ व्ही. बी. पाटील यांच्यासह श्रीनगर, मेरठ, पाँडीचेरी, पोर्ट ब्लेअर, लुधियाना, पंतनगर, पालमपूर, हिस्सार, जम्मू, ग्वालियर, रायपूर, पुसा, फैजाबाद, जोऱ्हात, भुवनेश्वर, रांची, पासीघाट, आनंद, दापोली, अकोला, उदयपूर, हैदराबाद, बेंगलूरू, रायचूर, त्रिसूर, कोइम्बतूर येथील कृषी विद्यापीठ आणि कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि संशोधकांची उपस्थिती होती.

बैठकीत वैविध्यपूर्ण पिकपद्धतीतील सुधारित शाश्वत तण व्यवस्थापन, तणाच्या वाढीची कारणे व बदलत्या हवामानानुसार तण व्यवस्थापनाचे उपाय आणि तणनाशकांचा प्रतिकार, जीवशास्त्र आणि पिकातील व पिकाबाहेरील तणांची समस्या आणि व्यवस्थापन, तणनाशकांचे अंश आणि पर्यावरणातील इतर प्रदुषण करणाऱ्या घटकांवर उपाययोजना, तण नियंत्रण तंत्राबद्दल थेट बांधावरचे संशोधन आणि त्याचा आढावा, तण व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर या विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. देशभरातील शास्त्रज्ञांनी ठिबक सिंचनाच्या विविध तंत्राद्वारे घेतल्या जाणाऱ्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून तण व्यवस्थापनाबद्दल जाणून घेतले. याशिवाय सौर ऊर्जा प्रकल्प, टिश्यूकल्चर, शेतमाल प्रक्रिया प्रकल्प अशा विविध प्रकल्पांना शास्त्रज्ञांनी भेट देऊन त्याची वाखानणी केली.

 

फोटोकॅप्शन : बैठकीचे उदघाटन करताना जबलपूर येथील राष्ट्रीय तण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. ए. आर. शर्मा, राष्ट्रीय तण संशोधन संचालनालयाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. शोभा सोंधिया, जैन इरिगेशनचे संशोधक डॉ. सुब्रमण्यम, कृषीविशेषज्ञ व्ही. बी. पाटील.

One thought on “शेतीतील तण व्यवस्थापनासाठी ठिबक तंत्राचाच प्रभावी उपयोग

Leave a comment