कांतिलाल हिरालाल जैन अनंतात विलीन

येथील ज्येष्ठ उद्योजक कांतिलालजी हिरालालजी जैन यांच्या पार्थिवावर जैन हिल्स येथे साश्रुनयनांनी सकाळी अंत्यसंस्कार केले गेले. त्यांचे पुत्र अभय आणि अविनाश, नातू आर्यम तसेच पुतणे अशोकभाऊ, अनिल, अजित, अतुल व अथांग यांनी अग्निडाग दिला. मा. आ. सुरेशदादा जैन, अरुणभाई गुजराथी, कविवर्य ना. धों. महानोर, मा. आ. गुरुमुख जगवानी, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, रतनलालजी बाफना, कस्तुरचंद बाफना, उद्योजक रजनिकांत कोठारी, रवींद्र भैय्या पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या अंत्यसंस्कारास विविध समाजाच्या सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कांतिलालजींना फुफ्फुसात जंतू संसर्ग, लिव्हरचा आजारावर उपचार करण्यासाठी मुंबईच्या ग्लोबल हॉस्पीटलमध्ये इलाजासाठी दाखल करण्यात आले होते. 4 एप्रील रोजी उपचारादरम्यान 74 व्या वर्षी दुःखद निधन झाले होते.  जैन ब्रदर्सच्या सुरूवातीपासूनच्या वाटचालीत त्यांचा अत्यंत मोलाचा सहभाग होता. ते जैन उद्योग समूहाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.

सकाळी 8 वाजता कांतिलालजी जैन यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा सुरू झाली. जैन हिल्स येथे त्यांच्यावर विधीवत संस्कार करण्यात आले. सेवादास दलुभाऊ जैन यांनी मांगलीक म्हटली तसेच स्व. कांतिलालजी जैन यांच्या स्मृतिंना उजाळा दिला. त्यात ते म्हणाले की, पुतण्या कांतिलाल यांनी आपल्या नावापुढे चोरडीया हे आडनाव लावणारा परिवारातील सदस्य होता. हसतमुख व अत्यंत दिलदार स्वभाव त्यांचा होता.

आपले ज्येष्ठ बंधू पद्मश्री भवरलालजी जैन यांच्या निधनानंतर 13 महिन्यात लहानभाऊ कांतिलालजी जैन यांची जीवनयात्रा पूर्ण झाली. परमेश्वर जैन परिवारास त्यांच्या वियोगाचे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करण्याबाबत परमेश्वराकडे प्रार्थना करू या असे ज्येष्ठ समाजसेवी तथा शाकाहार सदाचार परिषदेचे प्रणेते रतनलालजी बाफना यांनी उपस्थितांसमोर श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काल अभय जैन, अशोक जैन व जैन परिवारातील सदस्यांची निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली.  (जळगाव 5 एप्रील 2017)

Leave a comment