टिश्युकल्चर रोपे लागवडीची ‘ही मॅन’ची इच्छा

जळगाव, ता. ८ : जैव तंत्रज्ञानाने बनविण्यात आलेली केळी, डाळिंब, स्ट्रॉबेरी, पेरू, मोसंबीची रोगमुक्त रोपे पाहून आपण भारावलो असून माझ्या घरी ही रोपे लावून त्यांची फळे चाखायला मला आणि माझ्या कुटुंबियांना नक्कीच आवडेल, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया बॉलीवूडचे ‘ही मॅन’ म्हणून ओळखल्या जाणारे प्रसिद्ध अभिनेते धमेंद्र यांनी दिली. जैन हिल्सवरील बायोटेक लॅबला रविवारी सदिच्छा भेट देऊन त्यांनी शेती आणि शेतीशी संबंधित उच्च कृषी तंत्रज्ञानाची विस्तृत माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे कृषी व महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे, खासदार रक्षा खडसे, रोहिणी खडसे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सह व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन उपस्थित होते.

रविवारी दुपारी मुलगा व अभिनेता बॉबी देओल यांच्यासमवेत अभिनेते धर्मेंद्र यांचे जैन हिल्सवर आगमन झाले. जैन इरिगेशन आणि त्यांच्या मार्फत राबविले जाणारे शेती संदर्भातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतल्यावर हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार जैन हिल्सवरील बायोटेक लॅब, अतिघनदाट पद्धतीने केलेली आंबा, पेरू व मोसंबीची लागवड पद्धत, लाखो शेतकरी वापरत असलेली अत्याधुनिक सूक्ष्मसिंचन प्रणालीची पाहणी केली. जैन टिश्युकल्चर केळी रोपांपासून शेतकऱ्यांचा होणारा फायदा आणि अलिकडील काही वर्षात या रोपांची शेतकऱ्यांकहून ६ कोटी रोपांपर्यंतच्या वाढलेल्या मागणीबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. मीही एक शेतकरी असून. पंजाबमध्ये आमची शेती असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले. जैन व्हॅली येथील सोलर वीज निर्मिती प्रकल्प व सोलर युनिटला भेट देऊन त्यांनी सौर कृषी पंपाबद्दल माहिती जाणून घेतली.

गांधी तीर्थलाही भेट

गांधी तीर्थ येथेही अभिनेते धर्मेंद्र यांनी सदिच्छा भेट देऊन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. येथील डिजीटल स्वरूपातील अत्याधुनिक गांधी संग्रहालय पाहिल्यानंतर, ‘हे जे काही बनवले आहे, त्यातून स्वत: गांधीजी आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधत असल्याचे वाटते’ अशी भावपूर्ण प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. तसेच येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासोबत त्यांनी आवर्जून छायाचित्र काढून घेतले. त्यांच्यासोबत यावेळी राज्याचे कृषी व महसूल मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री एकनाथरावजी खडसे उपस्थित होते. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी महात्मा गांधीजींची मूर्ती आणि सुताचा हार देऊन धर्मेंद्र यांचे स्वागत केले. जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी त्यांना गांधी तीर्थ, गांधी रिसर्च फाऊंडेशन, बायोटेक लॅब याबद्दल माहिती दिली.

 

Leave a comment