दूरदर्शनच्या पुरस्काराने अनिल जैन यांचा सन्मान राज्यपालांनी केला जैन इरिगेशनच्या कार्याचा गौरव

मुंबई – दि. 12 (प्रतिनिधी) –

महाराष्ट्राची भूमी ही समृद्ध भूमी आहे. इथली जमीन सुपीक आहे. दुर्दैवाने आज महाराष्ट्रातील मराठवाडा व इतर काही भाग तीव्र दुष्काळाने होरपळत आहे. यातून सावरण्यासाठी पाण्याच्या प्रभावी व्यवस्थापनाची तीव्र गरज असून जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या जैन इरिगेशनने आपल्या कार्याची व्याप्ती आणखी वाढवून पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. ते मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री नवरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

_DSC0409--
राज्यपाल मा. विद्यासागर राव यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, अभिनेत्री, जुही चावला, अभिनेता धीरज कुमार. (छायाचित्र – राजेंद्र माळी)

अभिनेता धीरज कुमार, प्रसार भारती मंडळाचे सदस्य अनुप जलोटा, सुनील अलग, सिने तारका जुही चावला, सिद्धार्थ काक, किरण शांताराम, ज्येष्ठ गायक उदित नारायण, दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, शिवाजी फुलसुंदर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याहस्ते अनिल जैन यांना रत्नवैभव पुरस्कार देऊन गौरविले गेले. मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदीरात 12 मे रोजी हा सोहळा पार पडला.

जैन इरिगेशनने आजवर शासन, कृषी विद्यापीठ व लहान शेतकऱ्यांसमवेत कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी खूप मोलाचे कार्य केल्याचा गौरवही राज्यपालांनी आपल्या भाषणात केला. कृषी क्षेत्रातील बदलासाठी आजचे विद्यापीठातील तरूण संशोधक विविध वाटा शोधत असून अशा तरूण संशोधकांना प्रोत्साहन देऊन दिशा देण्यासाठी जैन इरिगेशनने पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. या नवरत्नांमध्ये डॉ. विजया राजाध्यक्ष (साहित्य), संगीतकार अजय-अतुल (संगीत), रामदास कामत (नाट्य), नाना पाटेकर (चित्रपट), डॉ. विजया वाड (शिक्षण), पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर (पत्रकारिता), अच्युत पालव (कला), आणि विजय फळणीकर (समाजसेवा) यांचाही पुरस्काराने गौरव केला गेला.

आई-वडिलांच्या संस्कारांचा व शेतकऱ्यांचा गौरव – अनिल जैन

दूरदर्शनचा हा पुरस्कार राज्यातील शेतकऱ्यांचा, आई-वडिलांच्या संस्काराचा गौरव असल्याची भावूक प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. उच्च कृषी तंत्रज्ञानातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रगतीची कास धरता यावी यासाठी आम्ही शेतीच्या बांधावर रुजणारे विविध संशोधन केले. या संशोधनातून शेतकऱ्यांनी आपली प्रगती साध्य केली. त्यामुळेच त्यांच्या प्रगतीसमवेत जैन इरिगेशन आज 7 हजार रुपये भांडवलातून 7 हजार कोटी रुपये उलाढालीचा मैलाचा टप्पा गाठू शकली असेही ते म्हणाले. जे शेतकरी ठिबक सिंचनाकडे वळाले त्या शेतकऱ्यांनी आत्महत्यासारख्या विचारांना कधी जवळ केले नाही. शेतकऱ्यांनी साध्य केलेली प्रगती अधिक व्हावी यासाठी आता आम्ही प्रभावी जल व्यवस्थापनासमवेत सौर ऊर्जेचीही जोड सिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a comment